अ‍ॅपशहर

क्रांतीदिनी मराठा समाजाचा ठोक मोर्चा

आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी राज्यातील सकल मराठा समाजाने मराठा मूक क्रांती मोर्चे काढले. अत्यंत संयमाने काढण्यात आलेल्या लाखोंच्या मोर्चानंतरही सरकारला मागण्यांबाबत पाझर फुटलेला नाही. मराठा समाजाने संयमाने मागण्या केल्याने सरकार फक्त आश्वासनावर बोळवण करत असल्याचा समज बनला आहे. त्यामुळेच मराठा समाजाने 'आता मूक नाही, तर ठोक मोर्चाद्वारे' मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी पुन्हा एकदा एल्गार केला आहे.

Maharashtra Times 23 Jul 2018, 5:21 am
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maratha-kranti-morcha


आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी राज्यातील सकल मराठा समाजाने मराठा मूक क्रांती मोर्चे काढले. अत्यंत संयमाने काढण्यात आलेल्या लाखोंच्या मोर्चानंतरही सरकारला मागण्यांबाबत पाझर फुटलेला नाही. मराठा समाजाने संयमाने मागण्या केल्याने सरकार फक्त आश्वासनावर बोळवण करत असल्याचा समज बनला आहे. त्यामुळेच मराठा समाजाने 'आता मूक नाही, तर ठोक मोर्चाद्वारे' मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी पुन्हा एकदा एल्गार केला आहे. उस्मानाबाद, बीड नंतर आता कोल्हापुरात क्रांतीदिनी (ता. ९ ऑगस्ट) ठोक मोर्चा काढून सरकारची कोंडी करण्यात येणार आहे.

अॅट्रासिटी कायद्याच्या दुरुस्तीसह शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळवण्यासाठी सकल मराठा समाजाने राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने मूक क्रांती मोर्चे काढले. राज्यातील या मोर्चानंतर सरकारने अनेक आश्वासने दिली. आश्वासनानंतरही मराठा समाजातील युवकांची नोकरी व शिक्षणामध्ये पिछेहाट सुरुच असून, दोन वर्षात सरकारने कोणत्याच आश्वासनाची पूर्तता न केल्याने मराठा समाजाने आता ठोक मोर्चा काढण्यास सुरुवात केली आहे. तुळजाभवानीचा जागर करुन मोर्चाच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे.

सोलापूर, उस्मानाबाद, बीड आदी ठिकाणी निघालेल्या ठोक मोर्चानंतर मोर्चाचे लोण हळूहळू राज्यभर पसरु लागले आहे. कोल्हापुरात मराठा क्रांती संघटनेच्या माध्यमातून मोर्चाची तयारी सुरू केली असून मोर्चाची जनजागृती करण्यासाठी ३१ जुलै रोजी मोटारसायकल रॅली काढून करवीर निवासिनी अंबाबाईला साकडे घालण्यात येणार आहे. याच दरम्यान मंत्र्यांच्या गाड्या अडवून त्या फोडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मंत्र्यांच्या गाड्या अडवणार

मराठा क्रांती संघटनेने क्रांतीदिनी (ता. ९ ऑगस्ट) ठोक मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्यात येणार आहे. तत्पूर्वी मंगळवारी ३१ जुलै रोजी करवीर निवासिनी अंबाबाईस साकडे घालण्यात येणार आहे. मोर्चापूर्वी जिल्ह्यात येणाऱ्या मंत्र्यांच्या गाड्या अडवण्यात येणार आहेत. प्रसंगी गाड्यांची तोडफोड करणाच्या इशारा देत गुन्हे दाखल होण्याची पर्वा करणार नसल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.


महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज