अ‍ॅपशहर

अंबाबाईच्या खजिन्यात वर्षभरात एक कोटीचे दागिने

करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या खजिन्यात गेल्या वर्षभरात एक कोटी नऊ लाख ७५ हजार किंमतीचे सोने व चांदीचे दागिने जमा झाले. वर्षभरात भाविकांकडून देणगीदाखल आलेल्या दागिन्यांची मूल्यांकन प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jun 2019, 7:42 pm
कोल्हापूरः
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ambabai


करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या खजिन्यात गेल्या वर्षभरात एक कोटी नऊ लाख ७५ हजार किंमतीचे सोने व चांदीचे दागिने जमा झाले. वर्षभरात भाविकांकडून देणगीदाखल आलेल्या दागिन्यांची मूल्यांकन प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाली. या दिवशीच्या सोनेदराप्रमाणे दागिन्यांची किंमत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी जाहीर केली. गेल्यावर्षीपेक्षा सोन्याच्या दागिन्यांमध्ये ८०० ग्रॅमने वाढ झाली असून, चांदीच्या अलंकारांमध्ये २४ किलोंनी घट झाली आहे.

देवीच्या दागिन्यांबाबत माहिती देताना जाधव म्हणाले की, देवस्थान समितीच्या अखत्यारित असलेल्या अंबाबाई देवस्थान आणि श्री जोतिबा देवस्थानाला दरवर्षी लाखो भाविक आपल्या ऐपतीप्रमाणे सोन्या-चांदीचे अलंकार अर्पण करतात. त्यात अनमोल पाचू, खडे, हिरे माणिकांचाही समावेश आहे. या सर्व दागिन्यांचे मूल्यांकन दरवर्षी जून महिन्यात करण्यात येते. त्यानुसार गेल्या वर्षी २०१८-१९ मध्ये देवीला अर्पण झालेल्या दागिन्यांचे मूल्यांकन १७ ते २० जून दरम्यान गरुड मंडप येथे पूर्ण करण्यात आले. सरकारमान्य अधिकृत मूल्यांकनकार पुरुषोत्तम काळे, योगेश कुलथे, उमेश पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

२०१७-१८ च्या तुलनेत सन २०१८-१९ मध्ये जमा झालेल्या दागिन्यांमध्ये वाढ झाली आहे. यात सोन्यामध्ये १७-१८ च्या तुलनेत ८०० ग्रॅमची वाढ होऊन एकूण सोने तीन किलो ४३२ ग्रॅम झाले आहे. तर चांदीमध्ये घट होऊन यावर्षी केवळ १० किलो ११६ ग्रॅम चांदी भाविकांकडून देणगी स्वरुपात आली आहे. गेल्या वर्षी देवीला ३४ किलो वजनाचे चांदीचे दागिने देणगी म्हणून आले होते. जोतिबा देवस्थान कडे २०१८-१९ मध्ये सोने १ किलो ७३ ग्रॅम सोने जमा झाले तर १ किलो ५३४ ग्रॅम चांदी जमा झाली आहे. यावेळी देवस्थानचे सचिव विजय पोवार, सदस्य संगीता खाडे, शिवाजी जाधव आदी उपस्थित होते.

३२ लाखांचा किरीट आणि ११ तोळ्यांचे बिस्कीट

गेल्या वर्षात नवरात्रौत्सव, दिवाळी, नाताळ व उन्हाळी सुट्टीतील पर्यटक भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. लाखो भाविक देवीच्या दर्शनाला आले. मंदिरात सध्या १७ दानपेट्या आहेत. यामध्ये भाविकांकडून दान स्वरुपात दागिनेही अर्पण करण्यात आले. यामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण दागिन्यांचा समावेश आहे. कर्नाटकातील एका भाविकाने अंबाबाईला ३२ लाखांचा ९८० ग्रॅम वजनाचा सोन्याचा किरीट अर्पण केला आहे. तर नवग्रहाचा सोन्याचा हारदेखील लक्षवेधी आहे. ११ तोळे वजनाचे व तीन लाख ३६ हजार किमतीचे सोन्याचे बिस्कीट भाविकाने दान स्वरुपात दिले आहे. काळ्या मण्याची पोत आणि सोन्याचे दोन मण्यासह वाट्या गाठवलेली मंगळसूत्रे मोठ्या संख्येने आली असून सध्या तीन पोती मंगळसूत्रे देवीच्या खजिन्यात आहेत. चांदीमध्ये जोडव्या, निरांजने, पानाचा विडा अशा दागिन्यांसह पूजा साहित्याचा समावेश आहे.

अंबाबाई देवस्थानकडे वर्षभरात जमा झालेले दागिने

सोनेः ३ किलो ४३२ ग्रॅम ७२० मिली
एकूण किंमत: १ कोटी ९ लाख ७५ हजार ४०३ रुपये
चांदीः १० किलो ११६ ग्रॅम, ९०० मिली
किंमत : ४ लाख १० हजार ७४६ रुपये

जोतिबा देवस्थानकडे जमा झालेले दागिने (सन २०१८-१९)

सोने : १७ तोळे
एकूण किंमत: ५ लाख ५० हजार ८१९ रुपये
चांदी : १ किलो ५३४ ग्रॅम ८०० मिली
एकूण किंमत: ६२ हजार ३१२ रुपये

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज