अ‍ॅपशहर

राजू शेट्टींनी वाजवला लोकसभेचा बिगुल; राज्यातील या ६ मतदारसंघातून लढणार स्वाभिमानी संघटना

Kolhapur Political News : लोकसभा निवडणुकीसाठी अजून एक वर्षाचा कालावधी आहे. पुढच्या वर्षी निवडणुका होणार आहेत. पण राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनाही काही जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे.

Authored byगुरुबाळ माळी | Edited byसचिन फुलपगारे | महाराष्ट्र टाइम्स 24 Mar 2023, 11:54 am
कोल्हापूर : आगामी लोकसभेच्या मैदानात राज्यातील सहा जागा लढवण्याची घोषणा करतानाच मतदारसंघही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निश्चित केले आहेत. हातकणंगले, सांगली, माढा, कोल्हापूर, बुलढाणा आणि परभणी या या जागांचा त्यामध्ये समावेश आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम raju shetti on lok sabha election
सांगली, माढा, कोल्हापूर, बुलढाणा, परभणी, हातकणंगले निश्चित, लोकसभेच्या मैदानात स्वाभिमानी


स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महायुतीतून बाहेर पडल्यानंतर 'एकला चलो रे' ची भूमिका घेतली. हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टी दोन वेळा निवडून आले आहेत. आता स्वतंत्रपणे राज्यातील सहा जागा लढविण्याचे घोषणा त्यांनी केली. गेल्यावेळी महाविकास आघाडी बरोबर आघाडी करताना हातकणंगले आणि सांगली हे दोन मतदारसंघ स्वाभिमानीने लढवले होते. आता मात्र सहा जागा लढण्याची घोषणा करतानाच मतदार संघ ही जाहीर केले आहेत.

हातकणंगले, सांगली, माढा, कोल्हापूर, बुलढाणा, परभणी असे हे मतदारसंघ आहेत. यामध्ये हातकणंगलेतून शेट्टी स्वतः लढणार असून बुलढाणा मतदारसंघातून रविकांत तुपकर यांची उमेदवारी निश्चित आहे. इतर चार मतदारसंघात स्वच्छ आणि ताकतीच्या उमेदवारांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, दुसरीकडे स्वाभिमानीने राष्ट्रीय समाज पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष आणि बहुजन विकास आघाडी बरोबरच बी. आर. एस. या पक्षाबरोबर आघाडी करण्याचे निश्चित केले आहे. तशी चर्चा या पक्षांच्या नेत्यांशी सुरू आहे. यामध्ये शेकाप व रासपने मान्यता दिली असून महादेव जानकर यांनी भाजप सोडल्यास त्यांना माढा किंवा परभणीतून लोकसभेला मैदानात उतरवण्याची ही तयारी आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत सहा जागा लढवतानाच या सर्व जागा निवडून आणण्यासाठी स्वाभिमानी प्रयत्न करणार आहे. याशिवाय सहा पक्षाबरोबर आघाडी करतानाच अन्य काही पक्षांना सोबत घेण्याचाही प्रयत्न सुरू आहे.


सहा जागा लढवतानाच दोन उमेदवार निश्चित आहेत. स्वच्छ चारित्र्याचे, ताकदीचे उमेदवार मिळाल्यास इतर चार ठिकाणी उमेदवार म्हणून घोषणा करण्यात येईल. याशिवाय समविचारी पक्षाबरोबर आघाडीही केली जाईल.

- राजू शेट्टी, माजी खासदार

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने तयारी केली आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट २१, राष्ट्रवादी काँग्रेस १९ तर काँग्रेस ९ जागा लढवणार असल्याचं सांगण्यात येतंय. तर भाजपनेही निवडणुकीसाठी कंबर कसली असून महाराष्ट्रातील मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केलं आहे.

महत्वाचे लेख