अ‍ॅपशहर

वाघाचं कातडं पांघरुन वाघ होत नाही तर अशा वाघांकडे पाठिंब्यासाठी का गेला होतात?, संजय पवारांचा निशाणा

"जर वाघाचं कातडं पांघरुन वाघ होता येत नाही. तर अशा वाघांकडे पाठिंब्यासाठी तुम्ही का गेला होतात?, असा रोखठोक सवाल करत मला मतं द्या म्हणत तुम्हीच पाठिंब्यासाठी शिवेसेनेकडे गेला होतात. तुम्हाला कोण बोलवायला आलं नव्हतं, असं प्रत्युत्तर संजय पवार यांनी संभाजीराजेंना दिलं आहे. तसेच संभाजीराजेंचा बोलविता धना कुणीतरी वेगळाच आहे, असंही पवार म्हणाले आहेत.

Authored byअक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Jun 2022, 10:08 pm
कोल्हापूर : 'वाघाचं कातडं पांघरलं म्हणून वाघ होता येत नाही', असं म्हणणाऱ्या छत्रपती संभाजीराजेंना सेनेचे पराभूत उमेदवार तथा शिवसेना नेते संजय पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. "राजेंचं ते विधान खेदजनक आहे. मला मतं द्या म्हणत तुम्हीच पाठिंब्यासाठी शिवेसेनेकडे आला होतात. तुम्हाला कोण बोलवायला आलं नव्हतं. संभाजीराजेंचा बोलविता धना कुणीतरी वेगळाच आहे", अशा शब्दात संभाजी पवार यांनी छत्रपती संभाजीराजेंना प्रत्युत्तर दिलंय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Sambhajiraje And Sanjay Pawar
छत्रपती संभाजीराजे आणि संजय पवार


राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या तिन्ही उमेदवारांचा विशेष करून कोल्हापूरच्या धनंजय महाडिक यांचा मोठा विजय झाला. या विजयावरून संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेला टोला लगावला. वाघाची कातडी ओढून वाघ होता येत नाही, अशी खरमरीत टीका संभाजीराजे छत्रपतींनी तुकोबांच्या अभंगाच्या ओळी ट्विट करत शिवसेनेवर केली. त्यांच्या याच टीकेला संजय पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय.

'...तर अशा वाघांकडे पाठिंब्यासाठी का गेला होतात?'

"जर वाघाचं कातडं पांघरुन वाघ होता येत नाही. तर अशा वाघांकडे पाठिंब्यासाठी तुम्ही का गेला होतात? मला मतं द्या म्हणत तुम्हीच पाठिंब्यासाठी शिवेसेनेकडे गेला होतात. तुम्हाला कोण बोलवायला आलं नव्हतं. संभाजीराजेंचा बोलविता धना कुणीतरी वेगळाच आहे. सर्कशीतले वाघ वेगळे असतात आणि जंगलातले वाघ वेगळे असतात. छत्रपती म्हणून तुमचा कायमच आदर राखत आलोय, इथून पुढेही राखेन. पण कृपा करुन आपण शिवसेनेवर टीका करु नये"

मराठा मोर्चाआडून राजकारण करू नये

मराठा मोर्चा हा कुणा व्यक्तीमुळे नव्हता त्यात प्रत्येक मराठा सहभागी होता. मी देखील एक मराठा आहे, हे मी आवर्जून सांगतोय. त्यामुळे कुणीही मराठा मोर्चा आडून राजकारण करू नये, असा टोलाही त्यांनी संभाजीराजेंना लगावला.

...तर निकाल काही वेगळा लागला असता

"मी निवडून येण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पण शेवटच्या क्षणी दगाफटका झाला. सेनेचा उमेदवार म्हणून नाही तर आपला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून प्रत्येकाने प्रयत्न केला असता तर निकाल काही वेगळा लागला असता", अशी खंतही संजय पवार बोलून दाखवली.

राज्यसभेत सेनेचा पराभव, संभाजीराजेंचा निशाणा

वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ।।
तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ।।


असं संभाजीराजेंनी ट्विटमध्ये म्हटलं. संभाजीराजे छत्रपती यांच्या ट्विटचा रोख हा शिवसेनेकडे होता. त्यांनी या ट्विटमधून शिवसेनाचा उल्लेख टाळत सेनेवर अप्रत्यक्षपणे टीका केली. वाघाचं कातडं पांघरलं म्हणून वाघ होता येत नाही , असंच त्यांना ट्विटमधून सांगायचं होतं.
लेखकाबद्दल
अक्षय आढाव
अक्षय आढाव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | याआधी टीव्ही ९ मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ५ वर्षांचा अनुभव | राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची विशेष आवड.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज