अ‍ॅपशहर

उदगावमधील शाळेच्या दोन खोल्या कोसळल्या

उदगाव (ता. शिरोळ) येथील जिल्हा परिषदेच्या देसाई विद्यामंदिर या मराठी शाळेच्या इमारतीच्या दोन वर्गखोल्या सोमवारी रात्री कोसळल्या. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, येत्या १५ जूनपासून शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांना कोठे बसवायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Maharashtra Times 14 Jun 2017, 3:00 am
जयसिंगपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम school room
उदगावमधील शाळेच्या दोन खोल्या कोसळल्या


उदगाव (ता. शिरोळ) येथील जिल्हा परिषदेच्या देसाई विद्यामंदिर या मराठी शाळेच्या इमारतीच्या दोन वर्गखोल्या सोमवारी रात्री कोसळल्या. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, येत्या १५ जूनपासून शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांना कोठे बसवायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, उदगाव येथे माळभागात देसाई विद्यामंदिराची मराठी शाळा आहे. १९३२ साली या शाळेची १० खोल्यांची इमारत बांधण्यात आली आहे. जिल्हा परिषदेकडून या इमारतीची डागडुजी केली जाते. १५ जूनपासून शाळा सुरू होणार असल्याने शाळेस रंगरंगोटी करण्यात आली आहे.

दरम्यान, सोमवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास शाळेच्या इमारतीतील खोली क्र. ८ व ९ मधील भिंत तसेच छत कोसळले. यावेळी मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळी या घटनेची माहिती मिळताच गटविकास अधिकारी एस. के. जाधव, गटशिक्षण अधिकारी ए. बी. वांदरे, शिरोळ पंचायत समितीचे सभापती मल्लाप्पा चौगुले, उपसभापती कविता चौगुले, सरपंच स्वाती पाटील, ग्रामविकास अधिकारी भाग्यश्री केदारी, पंचायत समिती सदस्य मीनाज जमादार, मन्सूर मुलाणी, सुरेश कांबळे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा जयश्री पाटोळे, उपसरपंच शिवाजी कोळी, मुख्याध्यापक विजयकुमार कोळी यांनी भेट देऊन पाहणी केली. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

१५ जूनपासून शाळा सुरू होणार आहे. शाळा सुरू झाल्यानंतर ही घटना घडली असती, तर मोठी जीवितहानी झाली असती. तब्बल ८५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या शाळेच्या दगडी भिंतींना तडे गेले आहेत. इमारत धोकादायक बनल्याने १५ जूनपासून या ठिकाणी शाळेचे वर्ग न भरविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यामुळे आता शाळेसाठी नवी इमारत शोधण्याची वेळ शाळा व्यवस्थापन समितीसमोर आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज