अ‍ॅपशहर

निधी संपवायचा म्हणून निविदांचा धडाका पण कंत्राटदारांची थकलेली बिलं कोण देणार? पंधरा हजार कोटींची बिलं थकली..!

बड्या कंत्राटदारांची बिले सरकार अडवत नाही पण छोट्या कंत्राटदारांची अडवणूक करत त्यांची बिल देण्यास शासन विलंब करतं. त्यामुळे बरेच कंत्राटदार कर्जबाजारी झाले असून त्यांची थकित बिले न दिल्यास नव्या आर्थिक वर्षापासून राज्यातील सर्व विकासकामे थांबविण्यात येतील, असा इशाराच कंत्राटदार संघटनेने दिला आहे.

Authored byगुरुबाळ माळी | Edited byअक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Mar 2023, 5:51 pm

हायलाइट्स:

  • अडीच लाख छोट्या कंत्रादटारांची १५ हजार कोटींची बिलं अडकली
  • १ एप्रिलपासून संघटनेचा काम बंदचा इशारा

बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
गुरुबाळ माळी, कोल्हापूर : मार्च अखेर निधी संपविण्यासाठी राज्यात विकास कामांच्या निविदा आणि कामांचा धडाका लावला जात आहे. दुसरीकडे मात्र राज्य सरकारने छोट्या कंत्राटदारांची बिले थकवली आहेत. अडीच लाख कंत्राटदारांचे तब्बल पंधरा हजार कोटींची बिले थकल्याने हे सारे हवालदिल झाले आहेत. नफा राहिला बाजूला तोटा कमी कसा करायचा याची चिंता त्यांना लागली आहे. यामुळे अनेकजण कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहेत. आठ दिवसांत देयके न दिल्यास प्रसंगी विकास कामांना ब्रेक लावण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील वर्षी लोकसभा निवडणूक आहे. भाजपची सत्ता आल्यानंतर सोबत आलेल्या खासदार आणि आमदारांना मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येत आहे. नवीन सरकार असल्याने सध्या निवडणुकीच्या तोंडावर कामांचा धडाका लावण्यात आला आहे. यामुळे निविदा प्रक्रियांना वेग आला आहे. महापालिका, जिल्हा परिषद, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने राज्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. पण ही कामे करणाऱ्या छोट्या कंत्राटदारांची अवस्था सध्या अतिशय बिकट झाली आहे.

राज्यात असलेल्या अडीच लाख छोट्या कंत्राटदारांना कामे दिली जात आहेत, पण त्यांची देयके देण्यात राज्य सरकारकडून सतत टाळाटाळ होत आहे. मंजूर कामाच्या दहा ते वीस टक्के रक्कम देत त्यांची बोळवण केली जात आहे. नियम आणि अटीमुळे वेळेत काम पूर्ण होण्यासाठी कर्जे काढून कंत्राटदार प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे मात्र कामाची पूर्तता होऊन वर्ष उलटले तरी देयके दिली जात नसल्याने ते हवालदिल झाले आहेत.

आदित्य ठाकरेंच्या लग्नाचा विधानसभेत विषय, फडणवीसांची मिश्किल टिप्पणी, आदित्य हसत हसत म्हणाले, धमकी देताय काय?
सतत मागणी केल्यानंतर केवळ दहा टक्के रक्कम हातावर टेकविली जाते. याउलट हॅम अंतर्गत मोठी कामे घेणाऱ्या कंत्राटदारांना कामापूर्वी दहा टक्के आणि काम सुरू होताच पन्नास टक्के रक्कम दिली जाते. त्यांची बिले अडवली जात नसल्याचे छोट्या कंत्राटदारांकडून सांगण्यात येते.

राज्यात विविध विभागाकडून सध्या पंधरा हजार कोटींची बिले थकीत आहेत. ती मिळावीत म्हणून महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना प्रयत्न करत असल्याचे महासंघाचे राज्य महासचिव सुनील नागराळे यांनी सांगितले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे सतत पाठपुरावा करूनही देयके मिळत नसल्याने कंत्राटदार कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आठ दिवसात बिले न दिल्यास एक एप्रिलपासून विकास कामे बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

३५०० हजार किलो कांदा विकला, शेतकऱ्याच्या हातात रुपया नाही, उलट व्यापाऱ्याने १८०० मागितले, अख्खं कुटुंब रात्रभर रडलं...
प्रलंबित बिले

  • सार्वजनिक बांधकाम- ३५५० कोटी
  • ग्रामविकास विभाग- १५५० कोटी
  • मृद व जलसंधारण- ३४०० कोटी
  • जलसंपदा-२७०० कोटी
  • इतर खाते- ५००० कोटी

एकीकडे बड्या कंत्राटदारांना त्यांची बिले न अडवता देणारे सरकार दुसरीकडे मात्र छोट्या कंत्राटदारांची अडवणूक करत आहे. यामुळे बरेच कंत्राटदार कर्जबाजारी झाले आहेत. त्यांची थकित बिले न दिल्यास एक एप्रिलपासून राज्यातील सर्व विकासकामे थांबविण्यात येतील, मिलिंद भोसले-राज्य अध्यक्ष

महत्वाचे लेख