अ‍ॅपशहर

धक्कादायक! कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप धोकादायक स्थितीत; मुख्य खांबच वाळवीने पोखरले

Kolhapur News Today : मंदिरातील अनेक धार्मिक विधी याच गरुड मंडपामध्ये केले जातात. गरुड मंडपाचा इतिहास पाहिला तर गरुड मंडप हा साधारण १८३९ च्या दरम्यान उभा करण्यात आ

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Jan 2023, 2:20 pm
कोल्हापूर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या श्री. करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेण्यासाठी रोज लाखो भाविक कोल्हापुरात येत असतात. अंबाबाई देवीच्या मंदिराची उभारणी साधारण सहाव्या-सातव्या शतकात करण्यात आल्याचे संदर्भ आढळून येतात. मंदिराचा महत्त्वाचा भाग असणारा गरूड मंडप कोल्हापूर गॅजेटनुसार १८३९ च्या दरम्यान उभा करण्यात आला आहे. मात्र याच गरुड मंडपाच्या महत्त्वाच्या आठ खांबांना वाळवीने पोखरले असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं असून मंदिर प्रशासनाकडून हे खांब दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ambabai temple news
अंबाबाई मंदिर, कोल्हापूर


मंदिर शास्त्रानुसार सदर भाग हा मंदिराच्या उभारणीच्या दृष्टीने महत्त्वाचा असून मंदिर परिक्रमेनंतर देवीची पालखी काही काळ विश्रांतीसाठी येथेच ठेवली जाते. शिवाय मंदिरातील अनेक धार्मिक विधी याच गरुड मंडपामध्ये केले जातात. गरुड मंडपाचा इतिहास पाहिला तर गरुड मंडप हा साधारण १८३९ च्या दरम्यान उभा करण्यात आल्याचे उल्लेख आढळतात. हा मंडप करवीर छत्रपती याच्या संस्थानचे पॉलिटिकल एजंट दाजी पंडितराव यांच्या कार्यकीर्दीत देवीच्या सदरेवरील कार्यक्रम व्यवस्थित पार पडावे, यासाठी उभारण्यात आला होता. तेव्हापासून गरुड मंडप हा अंबाबाई मंदिराचा मुख्य भाग म्हणून ओळखला जातो.

सरकारी अधिकाऱ्यांमुळे सरकारला भुर्दंड; ५ कोटींसाठी अडून बसले, पण आता कंत्राटदाराला द्यावे लागणार ३०० कोटी

गरुड मंडपाला एकूण ४८ खांब आहेत. ज्यात २० फूट लांबी आणि १५ इंच बाय १५ इंच जाडीचे आठ मुख्य खांब आहेत. पण याच गरुड मंडपाच्या महत्त्वाच्या आठ खांबांना वाळवीने फरशीच्या खालून पोखरलं असून खांबाच्या अवतीभवती असणारी फरशी काढल्यानंतर गरुड मंडप कशाप्रकारे धोकादायक स्थितीत आहे हे समोर आलं आहे.

देवस्थान समितीने तातडीची उपाययोजना करत वाळवीने पोखरलेला काही भाग कट करून त्याच्याखाली दगडी चौथऱ्याचा आधार देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केलं आहे. पुढील दोन महिन्यात गरुड मंडपाचे मुख्य आठ खांब बदलण्याचा निर्णय मंदिर समितीकडून घेण्यात आला आहे. मात्र नवीन आठ खांब बसविण्यासाठी २ हजार घनफुट इतकं लाकूड लागणार आहे. हे लाकूड किमान ४० फूट उंचीच्या झाडातून घ्यावं लागणार आहे.

दरम्यान, लाखो भाविकांचं शक्तिस्थान असलेल्या या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाची शक्य तितक्या लवकर देखभाल दुरुस्ती करण्याची मागणी भक्तांकडून होऊ लागली आहे.

महत्वाचे लेख