अ‍ॅपशहर

यंत्रणा शुद्धीकरणाचे आ‍व्हान

कोल्हापूर: कायदे धाब्यावर बसवून सुरू असलेला मनमानी कारभार, हप्तेखोरी आणि लाखो रुपयांच्या वरकमाईने उत्पादन शुल्क विभागाची प्रतिमा मलिन तर झालेलीच आहे, शिवाय वर्षानुवर्षे सुरू असलेली ही भ्रष्ट साखळी आणखी बळकट होत आहे. दोन निरीक्षकांसह एक पंटर लाचलुचपतच्या जाळ्यात सापडल्याने विभागातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे. एकाच जाग्यावर अनेक वर्षे ठाण मांडून बसेलेले काही कर्मचारी आणि अधिकारी लाचखोरीला प्रोत्साहन देत आहेत. नुकतेच रुजू झालेल्या अधीक्षकांसमोर संपूर्ण यंत्रणेच्या शुद्धीकरणाचे आव्हान निर्माण झाले आहे.

Maharashtra Times 27 Jul 2016, 3:00 am
Uddhav.Godase @timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम state excise corruption
यंत्रणा शुद्धीकरणाचे आ‍व्हान


कोल्हापूर: कायदे धाब्यावर बसवून सुरू असलेला मनमानी कारभार, हप्तेखोरी आणि लाखो रुपयांच्या वरकमाईने उत्पादन शुल्क विभागाची प्रतिमा मलिन तर झालेलीच आहे, शिवाय वर्षानुवर्षे सुरू असलेली ही भ्रष्ट साखळी आणखी बळकट होत आहे. दोन निरीक्षकांसह एक पंटर लाचलुचपतच्या जाळ्यात सापडल्याने विभागातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे. एकाच जाग्यावर अनेक वर्षे ठाण मांडून बसेलेले काही कर्मचारी आणि अधिकारी लाचखोरीला प्रोत्साहन देत आहेत. नुकतेच रुजू झालेल्या अधीक्षकांसमोर संपूर्ण यंत्रणेच्या शुद्धीकरणाचे आव्हान निर्माण झाले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे शहरासह जिल्ह्यात १७ निरीक्षक आणि सहायक दुय्यम निरीक्षक कार्यरत आहेत. प्रत्येक निरीक्षकाच्या कार्यकक्षेत असलेले बिअर बार, वाईन शॉप आणि मद्य उत्पादन करणारे कारखाने प्रत्येक महिन्याला हप्ते पोहोचवतात. प्रत्येक निरीक्षकाला महिन्याला किमान लाख रुपये हत्ते जमा करण्याचे उद्दिष्ट आहे. या रकमेत इतरही अधिकाऱ्यांचे वाटे आहेत. ज्यांच्याकडून हप्ते पोहोचत नाहीत, त्या ठिकाणी तातडीने स्पॉट व्हिजिट करून कारवाई करण्याची धमकी दिली जाते. भीती घालून हप्ता वाढवला जातो. जिथे विक्री जास्त तिथे हप्ता जास्त असे सूत्र असून, १५०० रुपयांपासून दहा हजारांपर्यंत हप्त्यांची रक्कम आहे. हप्ते गोळा करण्यासाठीही पंटरांचा वापर केला जात आहे. प्रत्येक निरीक्षकाने स्वतःच्या मर्जीतील खासगी व्यक्तीला पंटर म्हणून नेमले असून, त्यांच्यामार्फत सर्व दोन नंबरची कामे सुरू असतात. कार्यालयात आलेल्या तक्रारींच्या सेटलमेंटसाठीही पंटर पुढे असतात. विक्रीचे मासिक अहवालही पंटरांकडून अधिकाऱ्यांना पोहोचत आहेत. यावरच हप्त्यांची रक्कम कमी-जास्त केली जात आहे. तक्रारदार किंवा परवानेधारकांकडून लाचेची रक्कम स्वीकारण्यातही पंटर पुढे असल्याने मागील आठवड्यात लाचलुचपत प्रतिबंधकच्या जाळ्यात चम्या नावाचा पंटरही सापडला. यावरून उत्पादन शुल्क विभागातील पंटरराज स्पष्ट झाले आहे.

पंटरांसह उत्पादन शुल्क विभागात एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले कर्मचारी आणि काही अधिकारीही लाचखोरीला खतपाणी घातल आहेत. किंबहुना मोठ्या प्रकरणांमध्ये सेटलमेंटसाठी हेच कारभारी पुढे असतात. निलंबन होऊन पुन्हा सेवेत आलेले एक पंत या कामात एक्सपर्ट आहेत. गेली दहा वर्षे ते मुख्य कार्यालयात ठाण मांडून आहेत. बेकायदेशीर प्रकरणेही कायद्यात बसवण्यात यांचा हातखंडा आहे. काही प्रकरणे कायदेशीर असतील तर, वरकमाईसाठी त्रुटी काढण्यातही त्यांचा हात कोण धरत नाही. इचलकरंजीतही असेच काही ‘तज्ज्ञ’ अधिकारी कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार स्थानिक वरिष्ठांना नसल्याने राजकीय ताकत वापरून अपेक्षित ठिकाणी बदल्या करवून घेण्यातही या विभागातील अधिकारी सर्वाधिक आहेत. मलईदार ठिकाणी बदली करवून घेतल्यानंतर यांचा वेळ मलई शोधण्यातच जातो, त्यामुळे वरिष्ठ अधिकारीही हतबल आहेत.

गुप्त कारवायांवर भर

निरीक्षकांना बेकायदेशीर मद्य निर्मितीसह तस्करीचीही बित्तमबातमी मिळते. मात्र, अतिशय गोपनीय पद्धतीने कारवाया केल्या जातात. संबंधित दोषींना पकडून मुख्यालयात आणून तडजोड केली जाते. कारवाई करण्यापेक्षा न करण्यातून अधिक कमाई होत असल्याने गुप्त कारवायांवर भर आहे.

तक्रारींची दखलच नाही

उत्पादन शुल्क विभागातील अनेक लाचखोर कर्माचरी आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात नागरिकांनी मुख्यालयात तक्रारी केल्या आहेत. नागरी वस्तीतील बिअर बार आणि वाईन शापच्या विरोधातही तक्रारी दाखल आहेत, मात्र वर्षानुवर्षे याकडे अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे, असा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

१५ दिवसांपूर्वीच मी या कार्यालयाचा पदभार स्वीकारला आहे. आधीच्या सर्व अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील सर्व निरीक्षक, दुय्यम निरीक्षकांसोबत बैठक घेणार आहे. बेकायदेशीर कामे करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. कोणालाही पाठिशी घालण्याचा प्रकार होणार नाही.

विजय चिंचळकर, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज