अ‍ॅपशहर

मृतदेहाची शोधमोहीम पुन्हा आजपासून

सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांचा मृतदेह शोधण्याची मोहीम पोलिसांकडून पुन्हा सुरू होणार आहे. कोर्टासह राज्य सरकारने या शोध मोहिमेला परवानगी दिली आहे.

Maharashtra Times 27 Mar 2018, 9:06 am
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ashwini-gore


सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांचा मृतदेह शोधण्याची मोहीम पोलिसांकडून पुन्हा सुरू होणार आहे. कोर्टासह राज्य सरकारने या शोध मोहिमेला परवानगी दिली आहे. खासगी कंपनीकडून अद्ययावत साधनांचा वापर करून समुद्राच्या तळाशी मृतदेहाचा शोध घेतला जाणार आहे. या शोधातून महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

बिद्रे यांचा खून करून मृतदेहाचे तुकडे पत्र्याच्या पेटीत आणि प्लास्टिकच्या पिशवीत बांधून समुद्रात टाकल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. एप्रिल २०१६ मध्ये घडलेल्या गुन्ह्यातील मृतदेहाचा शोध नवी मुंबई पोलिसांकडून सुरू आहे. समुद्राच्या तळाशी टाकलेली पेटी शोधण्यासाठी पोलिसांनी नौदलाची मदत घेतली होती. मात्र, या शोधात पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. यानंतर अद्ययावत साधनांच्या साहायाने मृतदेहाचा शोध घ्यावा, अशी मागणी बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी केली होती. यानुसार पोलिसांनी राज्य सरकारकडे तपासाला परवानगी मागितली होती. एल अँड टी, फुग्रो या खासगी कंपन्यांशी चर्चा करून ग्रॅडिओमीटर, मॅग्नेटोमीटर मशीनची मागणी केली होती. याच्या खर्चाला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. चार दिवसात पुन्हा शोध मोहिमेला सुरुवात होणार आहे. यात ग्रॅडिओमीटर आणि मॅग्नेटोमीटरच्या मदतीने मृतदेहाचा शोध घेतला जाणार आहे. यातून महत्त्वाची माहिती हाती लागेल, अशी अपेक्षा बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, कुरुंदकर याने गुन्ह्यात वापरलेल्या शस्त्रांची माहिती अद्याप पोलिसांना मिळालेली नाही. मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरलेले वूडकटर आणि बॅटचा शोध सुरू आहे. त्याची खरेदी कुठे केली होती याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. या दोन्ही वस्तूंचा शोध आजरा येथील फार्महाऊसमध्ये घेण्यात आला होता, मात्र त्या वस्तू पोलिसांना मिळालेल्या नाहीत.

अजित पवारांनी काढले सरकारचे वाभाडे

अश्विनी बिद्रे खून प्रकरणावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अजित पवार यांनी अधिवेशनात सरकारचे वाभाडे काढले. महिला पोलिस अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या नराधमास कठोर शिक्षा झाली पाहिजे, यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत. कोणालाही पाठीशी घालू नये. संशयित आरोपी अभय कुरुंदकर याला राष्ट्रपती पदक मिळावे, यासाठी शिफारस करणारे कोण आहेत? याचाही पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी अजित पवार यांनी अधिवेशनात केली आहे. या मुद्यावरून त्यांनी गृह खात्याला लक्ष्य केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज