अ‍ॅपशहर

'गद्दारांचे सरकार कोसळणारच'; पावसात कार्यकर्त्यांच्या गर्दीतून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Kolhapur news : कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथे रिमझिम पावसात झालेल्या सभेत आदित्य यांनी व्यासपीठाऐवजी कार्यकर्त्यांच्या गर्दीत येऊन सर्वांना संवाद साधला.

Authored byगुरुबाळ माळी | महाराष्ट्र टाइम्स 2 Aug 2022, 8:53 am
कोल्हापूर : 'माणुसकी आणि विश्वास यांच्या पाठीत खंजीर खुपसून राज्यात आलेले नवीन सरकार हे बेकायदेशीर, बेईमानी आणि गद्दारांचे असून, ते कोसळणार म्हणजे कोसळणारच,' असा विश्वास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कोल्हापुरातील सभेत व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Aditya thackeray kolhapur
आदित्य ठाकरे सभा


राज्यात सत्ताबदल झाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. सोमवारी त्यांनी आजरा, कोल्हापूर व जयसिंगपूर येथे जाहीर सभा घेत बंडखोर आमदार व खासदारांचा चांगलाच समाचार घेतला. कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथे रिमझिम पावसात झालेल्या सभेत त्यांनी व्यासपीठाऐवजी कार्यकर्त्यांच्या गर्दीत येऊन सर्वांना संवाद साधला. या सभेत सीमाभागातील अनेक कार्यकर्त्यांनी सेनेत प्रवेश केला. तत्पूर्वी, त्यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले.

भीषण! विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली घाटात पलटली; एकाचा मृत्यू, ३० ते ३५ जखमी

आदित्य ठाकरे म्हणाले, 'ज्यांना आम्ही गरजेपेक्षा जास्त आणि लायकीपेक्षा अधिक प्रेम दिले, विश्वास दिला; त्यांनीच आमच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे त्या ४० आमदार आणि १२ खासदारांची ओळख ही गद्दार म्हणूनच कायम राहील. आम्ही राजकारण न करता समाजकारण करत बसल्यानेच त्यांनी आमच्याशी राजकारण केले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात असताना हे गद्दार आमदार, खासदार विकत घेत होते, रुग्णालयातील आजारी माणसाला विश्वास देण्याऐवजी त्यांचा विश्वासघात केला, याचे फार वाईट वाटते.'

देशात लोकशाही शिल्लक आहे की नाही, असा सवाल करताना ठाकरे म्हणाले, 'आमची लढाई ही सत्ता आणि सत्य यांच्यात सुरू आहे. राज्यात आतापर्यंत अनेक राज्यपाल पाहिले; मात्र सध्यासारखा राजकीय राज्यपाल पाहिला नाही. जो मुंबईतील मराठी माणसाला कमी लेखतो, मराठी माणसाला आणि शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्यावर टीका करतो.'

दरम्यान, या वेळी खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख सुनील मोदी, माजी आमदार सुरेश साळोखे, माजी आमदार सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील उपस्थित होते.

महत्वाचे लेख