अ‍ॅपशहर

‘जहाँगीर’च्या दालनात ‘माय ब्लॅक, माय व्हाइट’

कोल्हापुरातील तरुण चित्रकार युवराज पाटील यांचे माय ब्लॅक, माय व्हाइट हे चित्र प्रदर्शन मुंबईतील जहाँगीर आर्ट गॅलरीत सुरू झाले आहे.

Maharashtra Times 6 Jun 2017, 11:45 pm
Mahesh.Patil@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम yuvraj patil painting exhibition in jehangir art gallery
‘जहाँगीर’च्या दालनात ‘माय ब्लॅक, माय व्हाइट’

Tweet : @MaheshpMT

खरंतर जन्मतःच मनुष्याला कोणत्याही रंगाच्या आधी विविध आकार, वस्तू, प्राणी, मानव, निसर्ग या साऱ्या गोष्टींचे आकलन ‘ब्लॅक अँड व्हाइट’मधूनच होते, ही कन्सेप्ट आहे तरुण चित्रकार युवराज पाटील यांची. ‘चारकोल’च्या माध्यमातून कॅनव्हासवर काळ्या व पांढऱ्या रंगांच्या विविध छटांचा वापर करून त्यांनी साकारलेल्या कलाकृती पाहणाऱ्या नजरेसमोर एक आगळेच विश्व उभे करतात. साकारल्या आहेत. अवकाशाचे अचूक भान राखत त्यांनी केलेले चित्रांची रेखाटन म्हणजेच त्यांचे विश्व. ‘माय व्हाइट, माय ब्लॅक’मधून हे विश्व मंगळवारपासून (ता. ६ जून) जहाँगीर आर्टमध्ये रसिकांसमोर खुलणार आहे.

मूळचे राधानगरी तालुक्यातील पिंपळगाव शेतकरी कुटुंबातील युवराज पाटील यांची आजवर मुंबई, दिल्ली, गोवा यांसह कोल्हापूरमध्येही प्रदर्शने झाली आहेत. ते सध्या कोल्हापुरातील आर. के. नगरात राहतात. लहानपणापासूनच चित्र रेखाटण्याचे वेड पुढे त्यांच्यासाठी करिअरच बनले. युवराज यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूर, कौलव येथे झाले. त्यांनी चित्रकलेचे धडे कलाशिक्षक संजय कुंभार यांच्याकडून घेतले. दहावीनंतर कला शिक्षक डिप्लोमा व जी. डी. आर्ट उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी पुण्यात कला क्षेत्रातील पदवी संपादन केली. सध्या ते मुंबईत डोंबिवलीतील करंदीकर कला अॅकॅडमीत सहायक अधिव्याख्याता आहेत. कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन, मुंबई (वरळी) येथील नेहरू सेंटर, प्रदर्शक आर्ट गॅलरी, आर्टिस्ट सेंटर येथे त्यांची चित्रप्रदर्शने झाली आहेत.

कृष्ण-धवल चित्रे ही त्यांच्या चित्रांची खासियत. चित्र खुलविण्यासाठी लाल रंगाचा अचूक वापर युवराज करतात. भटकी जमात, मुंबईतील जनजीवन, नावाडी, हत्ती आणि भिक्खु, बनारस काठ, गेटवे ऑफ इंडिया यांसारखी स्मारके हे त्यांच्या चित्रांचे विषय आहेत. ही चित्रे साकारताना त्या चित्रांत सजीवता आणि मोहकता निर्माण करण्याची त्यांची हातोटी थक्क करणारी आहे. कॅनव्हासवर चित्र, चित्रावकाश, आकार व रुप हे केवळ काळा रंग, पांढरा किंवा छाया भेदातून व्यक्त करताना युवराज एक आगळं अवकाश आपल्यासमोर उभं करतात.

मुंबईत जहाँगीर गॅलरीतील त्यांचे हे दुसरे चित्रप्रदर्शन आहे. ६ ते १२ जून या कालावधीतील या प्रदर्शनात २७ कलाकृती मांडण्यात येणार आहेत. घोडे, भिक्षू, निसर्गचित्रे, प्रवासातील घोडेस्वार यांचे चित्रे त्यांनी चारकोलच्या माध्यमातून रेखाटली आहेत. चित्रातील विषय रंगवताना विषयानुरुप चित्रातील बारीकसारीक तपशील रंगवणे किंवा प्रसंगानुरूप ते टाळणे हे त्यांनी अचूकपणे केले आहे. चित्रातील लाल रंग, निळा रंग, पिवळा रंग यांमुळे चित्रात सजीवता व मोहकता निर्माण करण्यात आली आहे. पाटील हे आपल्या चित्रकलेत नवनवे प्रयोग करतात. यापूर्वी त्यांची सोलो एक्झिबिशनही झाली आहेत. अनेक पारितोषिके मिळवत या चित्रकाराने आपला कलाप्रवास नव्या दिशेला नेला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज