अ‍ॅपशहर

हृदय पिळवटून टाकणारी घटना; दिवसभर शोधलं, पण सापडला नाही, चिमुकला दिसताच बापानं टाहो फोडला

Latur News : लातूर जवळ असलेल्या खाडगाव शिवारात दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तलावात तीन मुलं बुडाली. यावेळी मुलांच्या वडिलांनी धाव घेत दोघांना बाहेर काढलं. पण तिसरा मात्र वाचू शकला नाही. तर दुसऱ्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

Authored byसचिन फुलपगारे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Mar 2023, 9:00 am
लातूर : लाकडं तोडण्यासाठी नजर वळताच तिन्ही मुलं तलावात बुडाल्याचं बापाला लक्षात आलं. धावत घेऊन दोन लेकरांना कसंबसं बापानं बाहेर काढलं. पण तिसरा चिमुकला हाती लागलाच नाही. दिवसभर तलावात शोधलं. पण लेकरू सापडलच नाही. दुसऱ्या दिवशी चिमुकल्याचा मृतदेह पाण्यावर तरंगतना आढळला आणि काळीज चिरलेल्या बापानं टाहो फोडला. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे, लातूर लगत असणाऱ्या खाडगाव शिवारात.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम latur news
हृदय पिळवटून टाकणारी घटना; दिवसभर शोधलं, पण सापडला नाही, चिमुकला दिसताच बापानं टाहो फोडला


चार लेकरं घेऊन पोटाची खळगी भरावी अन् कष्ट करून अंगावरचं कर्ज फेडावं असा विचार करून शिवदास चव्हाण यवतमाळ जिल्ह्यातून ऊस तोडणीसाठी लातूरला आले अन् पोटच्या पोराला गमावून बसले. चार महिन्यात कुटुंबातील चार माणसांचा बळी घेतलाय, या गरिबिनं. डोक्यावर कर्ज होऊनही आजारी आई -वडील, भावजय पक्षाघात झालेल्या भावाला वाचवता येऊ शकले नाही. आता तर पोटचा गोळा बघता बघता तलावात बुडाला. तलावाच्या पाण्यात त्याचा चिमुकला अजय नाहीसा झाला. यामुळे पहाडासारख्या शिवदासचं काळीज पाणी - पाणी झालं. तलावातील पाण्याच्या काठावर मासे पकडण्यासाठी बसलेल्या तरुणांना मदतीची याचनाही केली. पण कोणीच मदतीला आलं नाही.

सदाशिव वेडा होऊन पाण्यात चिमुकल्या अजयला शोधू लागला. अजय सापडला नाही. पाण्यातून काढून काठावर टाकलेल्या दोन लेकरांचा तरी जीव वाचवा म्हणून तो अखेर पाण्याच्या बाहेर आला. अन् लेकरांना दाबून शरीरातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागला. अशा स्थितीतही त्याला कोणाची मदत मिळेना. अखेर तो धावत पळत फडावर आला. यानंतर सर्वांनी तलावाकडे धाव घेतली. फोनाफोनी झाली, रुग्णवाहिका बोलावली आणि मुलांना रुग्णालयात नेलं. एकाला मुलाला डिस्चार्ज दिला. पण एकाची प्रकृती चिंताजनक आहे. सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या मुलाचं नाव कृष्णा तर बरा असलेल्या मुलाचं नाव बालाजी. तलावात बुडाला तो अजय.

आठवडी बाजार आटपून कुटुंब निघालं; सहा जण एकाच बाईकवर; चौघांचा प्रवास अखेरचा ठरला
दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी आले. शोध मोहीम सुरू झाली. 'तलावात जिथं मांडिभर पाणी तिथं त्यांची शोध मोहीम', असं पण सदाशिव सांगतात. तलावाच्या मध्यभागी तर सदाशिव एकटाच काळजाच्या तुकड्याला वेड्यासारखं शोधत होता. पाण्याच्या अन् भावनेच्या तलावात गटांगळ्या खात होता. अखेर दुसऱ्या दिवशी सायंकाळी अजयचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला.

भाऊ विहिरीत पडला म्हणून वाचवायला गेला पण, एकाच दिवशी कुटुंबावर दोन पोरांच्या अंत्यविधीची वेळ
आता अजयचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शावागारात ठेवलय. कृष्णा अतिदक्षता विभागात उपचार घेतोय. मुलगी अन् पत्नी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कृष्णाजवळ तर शिवदास घाबरलेल्या बालाजीजवळ वस्तीवर. जगण्यातली ही हतबलता कोणाच्या वाट्याला येऊ नये अशीच काळीज चिरणारी. आता सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह ताब्यात देण्यात येईल. गाव सोडून खाडगावच्या शेत -शिवारात नाहीतर खाडगावच्या स्मशानभूमीत अजयवर अंत्यसंस्कार करण्यात येईल. जिल्हा सोडून जाईल तेंव्हा काळीज फाटलेला बाप अन् कायमचं जग सोडून गेलेला चिमुकला अजय यांच्यातील स्मशानभूमीचा दुवाही सुटेल. सुटणार नाहीत त्या समस्या. सदाशिव एकटाच नाही अशी १२ कुटुंब त्याच्या सोबत यवतमाळवरून आलीत.
लेखकाबद्दल
सचिन फुलपगारे
सचिन फुलपगारे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत, मीडियामध्ये काम करण्याचा १९ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक आणि सर्वसामान्यांशी निगडीत प्रश्न आणि मुद्द्यांवर काम करण्यात आवड आहे. सतत नवीन शिकण्याची तयारी.... आणखी वाचा

महत्वाचे लेख