अ‍ॅपशहर

नाट्य परिषद निवडणुकीत विरोधाची धार बोथट

विद्यमान नाट्य परिषद अध्यक्षांचा अर्ज बाद झाल्यामुळे यंदा अधिक चर्चेत आलेली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद निवडणूक फारसा विरोध न होता पार पडणार अशीही चिन्हे दिसू लागली आहेत. मोहन जोशी गटातील चार गडी न लढताच बाद झाले आहेत.

Maharashtra Times 25 Jan 2018, 6:00 am
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस
महाराष्ट्र टाइम्स.कॉम natak


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

विद्यमान नाट्य परिषद अध्यक्षांचा अर्ज बाद झाल्यामुळे यंदा अधिक चर्चेत आलेली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद निवडणूक फारसा विरोध न होता पार पडणार अशीही चिन्हे दिसू लागली आहेत. मोहन जोशी गटातील चार गडी न लढताच बाद झाले आहेत. त्यातच अतुल परचुरेही अर्ज मागे घेणार आहेत. त्यामुळे ही लढत अधिकच सोपी होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. आज, गुरुवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.

मोहन जोशी यांचा अर्ज बाद झाल्यानंतर यासंदर्भात अनेक चर्चा रंगल्या आहेत. यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरायची इच्छा नसलेले जोशी नेमके निवडणूक लढण्यासाठी का तयार झाले, याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासंदर्भात राजकारणातील एका वरिष्ठ नेत्यांनी त्यांना निवडणूक लढवण्यास सांगितले, असेही सांगितले जात आहे. जोशी निवडणूक लढवण्यास तयार नसताना त्यांना राजकीय नेत्याने केलेल्या आग्रहापोटी निवडणूक अर्ज दाखल केल्याने नाट्यवर्तुळातील राजकीय हस्तक्षेपाबद्दलही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, जोशी पॅनलमधील परचुरे हेसुद्धा निवडणुकीच्या रिंगणाबाहेर पडणार आहेत. यासंदर्भात निवडणुकीच्या दिवशी मुंबईबाहेर जात असल्याने अर्ज मागे घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीच्या दिवशी मुंबईबाहेर नसल्याने निवडणुकीला उभे राहण्यात अर्थ नसल्याचे सांगत त्यांनी अर्ज मागे घेणार असल्याची चर्चा खरी असल्याचे सांगितले. अध्यक्षांचाच अर्ज बाद झाल्याने जोशी गटामध्ये थोडे औदासिन्य आले असून, आणखी एखादा गडीही बाद होण्याची शक्यता असल्याची चर्चा बुधवारी रंगली होती. या सर्व पार्श्वभूमीवर प्रसाद कांबळी पॅनलला होणाऱ्या कडव्या विरोधाची धार अचानक बोथट झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मोहन जोशी पॅनलकडून जोशी यांचे काम जगासमोर असल्याने हे पॅनल चांगली कामगिरी करेल, असा विश्वास अभिनेत्री सविता मालपेकर यांनी व्यक्त केला. यासंदर्भात जोशी यांच्यानंतर आता अध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार असलेल्या दीपक करंजीकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.

राजकीय हस्तक्षेप नको

मुंबईमध्ये प्रामुख्याने रंगकर्मी उमेदवार म्हणून उभे राहिले असले तरी सोलापूर, पंढरपूर, नागपूर येथे राजकीय मंडळींनीही नाट्य परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामुळे रंगकर्मींची बाजू सरकारपर्यंत पोहोचते का, याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे मराठवाडा येथील ज्येष्ठ रंगकर्मी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या घटनादुरुस्ती समितीचे उपाध्यक्ष नाथा चितळे यांनी सांगितले. विदर्भातही हा आक्षेप नोंदवण्यात आला आहे. ११ पात्र उमेदवारांपैकी पाच जण राजकीय पार्श्वभूमीचे आहेत असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे रंगमंचाची ही ताकदही राजकीय नेत्यांच्या हातात जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

क्रियाशील सदस्यांनाच अधिकार

गेल्या पाच वर्षांमध्ये एकदाच पैसे भरून अनेकांना नाट्य परिषदेचे सदस्यत्व देण्यात आले आहे. त्या माध्यमातून अनेक जण मतदारही झाले आहेत. यामध्ये आपला उमेदवार जिंकावा म्हणून राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीही मतदार म्हणून समाविष्ट होतात. मात्र नोव्हेंबरमध्ये झालेल्या घटनादुरुस्तीनुसार आता यापुढे क्रियाशील सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत हा प्रकार थांबला नाही तरी पुढील निवडणुकीपासून या राजकीय हस्तक्षेपावर आळा येईल, अशी आशा चितळे यांनी व्यक्त केली. मतदार करून घेतानाच ही काळजी घेण्यात येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज