अ‍ॅपशहर

मुंबईकरांनो महिनाभर पाणी जपून वापरा, शुक्रवारपासून १५ टक्के पाणीकपात; वाचा सविस्तर

मुंबईकरांनो महिनाभर पाणी जपून वापरा, ३१ मार्चपासून पुढील महिनाभर १५ टक्के पाणीकपात केली जाणार आहे, मुंबई महापालिकेने अशी माहिती दिली आहे.

Edited byमानसी क्षीरसागर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Mar 2023, 6:28 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याची ठाणे येथे कूपनलिकेच्या खोदकामामुळे हानी झाली आहे. यासंबंधी गळतीच्या दुरुस्तीचे काम ३१ मार्चपासून सुरू करण्यात येणार आहे. यामुळे मुंबईला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात ३१ मार्चपासून पुढील ३० दिवस १५ टक्के पाणीकपात केली जाणार असल्याची माहिती मुंबई पालिकेने दिली आहे. मुंबई पालिकेकडून ठाणे शहराला पुरवल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबतही ही कपात लागू राहील.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम water cut in mumbai


मुंबई महापालिका अंतर्गत मुंबई शहर व उपनगराच्‍या एकूण पाणीपुरवठ्यापैकी सुमारे ६५ टक्‍के पाणीपुरवठा हा भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्राद्वारे केला जातो. या केंद्रास होणारा ७५ टक्‍के पाणीपुरवठा मुख्‍यत्‍वे ५,५०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या १५ किलोमीटर लांबीच्‍या जलबोगद्याद्वारे होतो. या जलबोगद्यास ठाणे येथे कूप‍नलिकेच्‍या खोदकामामुळे हानी पोहोचली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत आहे. दुरुस्‍तीसाठी हा जलबोगदा पूर्णपणे बंद करणे व त्या काळात पर्यायी जलवाहिन्यांद्वारे भांडुप संकुल जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहोचविणे आवश्‍यक आहे. पर्यायी पाणीपुरवठा व्‍यवस्‍था कार्यान्वित करण्‍यासाठी काही अत्‍यावश्‍यक बदल करणेही गरजेचे आहे.

पर्यायी व्यवस्थेस तांत्रिक मर्यादा

पर्यायी व्‍यवस्‍थेचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यास तांत्रिक कारणास्‍तव मर्यादा आहेत. त्यामुळे सध्‍या भांडुप संकुल येथे प्रक्रिया होत असलेल्‍या प्रमाणाइतके पाणी पोहचविणे व प्रक्रिया करणे शक्‍य होणार नसल्याचे मुंबई पालिकेने म्हटले आहे. हे लक्षात घेऊन मुंबई पालिकाक्षेत्रासाठी आणि मुंबई पालिकेतर्फे ठाणे शहरास होणाऱ्या पाणीपुरवठ्यात ३१ मार्चपासून एक महिनाभर १५ टक्‍के पाणीकपात करण्‍यात येणार आहे. या कपातीमुळे मुंबईकरांनी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
लेखकाबद्दल
मानसी क्षीरसागर
मानसी क्षीरसागर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजीटल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | डिजीटल पत्रकारितेचा सहा वर्षांचा अनुभव आहे | सामाजिक, राजकीय, मनोरंजन याबरोबरच माहितीविषयक आणि विश्लेषणात्मक बातम्यांचे कव्हरेज करण्याची विशेष आवड... आणखी वाचा

महत्वाचे लेख