म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई ब्रँडेड कंपनीचे कपडे, मोबाइल, घड्याळे घालण्याची प्रचंड क्रेझ अनेकांमध्ये असते. ब्रँडेड कंपनीच्या वस्तू स्वस्तात देण्याच्या बहाण्याने बनावट वस्तू विकल्या जातात. मुंबई गुन्हे शाखेने दक्षिण मुंबईतील मुसाफिर खाना परिसरात छापा टाकून सुमारे १५ लाखांची बनावट घड्याळे हस्तगत केली. मुंबईतील गेल्या दोन महिन्यातील ही चौथी कारवाई आहे. कॅल्विन क्लेन, राडो, फास्टट्रॅक यांसारख्या नामांकित कंपन्यांच्या नावे बनावट घड्याळे तयार करून त्याची बाजारात विक्री केली जात असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मुसाफिर खाना येथील गाळ्यांमध्ये छापा टाकला. विविध कंपन्यांची नावे टाकण्यात आलेली सुमारे १५ लाखांची घड्याळे पोलिसांनी जप्त केली. हरीश पुरोहित, गणपतलाल पुरोहित आणि निंबाराम देवासी या तिघांना अटक करण्यात आली. यामध्ये मोठी साखळी कार्यरत असल्याचा पोलिसांचा अंदाज असून त्यादृष्टीने तपास सुरु आहे. मुंबईकरांनी ब्रॅण्डेडच्या नादात स्वस्तात मिळतात म्हणून घड्याळे खरेदी करू नयेत, खरेदी करण्यापूर्वी शहानिशा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.