अ‍ॅपशहर

घरांच्या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण; दोन हजार गिरणी कामगारांचा सहभाग

सरकारकडे गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी ‘एमएमआरडी’प्रमाणेच महसूल विभाग आणि राज्य सरकारच्या जमिनींची पाहणी करून १८४ एकर जमिनीवर घरे बांधण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 17 Jan 2023, 9:29 am
मुंबई : गिरणी कामगार कृती संघटनेतर्फे सोमवारी सुमारे दोन हजार कामगारांनी विविध मागण्यांसाठी लालबाग येथील भारतमाता चित्रपटगृहाजवळ सकाळी १० ते दुपारी ४ वेळेत लाक्षणिक उपोषण केले. राज्य सरकारने सुमारे एक लाख ७० हजार गिरणी कामगारांना घरे देण्याकडे दुर्लक्ष केले आहे. मागील २२ वर्षांत केवळ १७ हजार गिरणी कामगारांना घरे देण्यात आली आहेत. उर्वरित कामगारांना घरे देण्यांची मागणी अजूनही प्रलंबित आहे. त्यासह विविध मागण्यांसाठी कामगारांनी हे उपोषण केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mill worker strike
घरांच्या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण; दोन हजार गिरणी कामगारांचा सहभाग


गिरणी कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात गेल्या सहा महिन्यांत सरकारदरबारी पाच वेळा निवेदन देण्यात आले. या मागण्यांसाठी नोव्हेंबरमध्ये आझाद मैदान येथे मोर्चाही काढण्यात आला होता. परंतु, त्यावर अद्याप मार्ग निघत नसल्याने संतप्त कामगारांनी लाक्षणिक उपोषण केले. सरकारकडे गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी ‘एमएमआरडी’प्रमाणेच महसूल विभाग आणि राज्य सरकारच्या जमिनींची पाहणी करून १८४ एकर जमिनीवर घरे बांधण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, खासगी विकासक आणि म्हाडामार्फत बांधण्यात येणाऱ्या ५० हजार घरांविषयीही प्रस्ताव देण्यात आल्याचे गिरणी कामगार कृती समितीचे म्हणणे आहे.

केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी नुकतीच एनटीसीच्या ११ गिरण्यांच्या चाळींच्या पुनर्विकासास हिरवा कंदील दाखवण्याची घोषणा केली. या चाळीत सुमारे दोन हजार कुटुंबे राहतात. या गिरण्यांच्या चाळींची शेकडो एकर जमीन असून तिथे चार चटईक्षेत्र निर्देशांक दिला तरीही १५ ते २० एकर जमिनीवर रहिवाशांचे पुनर्वसन होऊ शकते. त्या जमिनीवर बांधण्यात येणारी घरे आणि उर्वरित जागेवर गिरणी कामगारांना घरे देण्याची मागणीही कामगारांनी यावेळी केली. या उपोषणात कृती संघटनेचे नेते गोविंद मोहिते, प्रवीण घाग, जयप्रकाश भिलारे, नंदू पारकर आदींचा समावेश आहे. यावेळी आमदार सचिन अहिर यांनी कामगारांना मार्गदर्शन केले.

महत्वाचे लेख