अ‍ॅपशहर

महिला पोलिसाकडून ५० विद्यार्थी दत्तक

म टा खास प्रतिनिधी, मुंबईकरोनाशी लढणाऱ्या मुंबई पोलिस दलाकडून अव्याहत सेवा सुरू असताना विविध रूपाने सामाजिक बांधिलकीही जपली जात आहे...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 May 2020, 4:00 am

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

करोनाशी लढणाऱ्या मुंबई पोलिस दलाकडून अव्याहत सेवा सुरू असताना विविध रूपाने सामाजिक बांधिलकीही जपली जात आहे. नायगाव सशस्त्र दलातील महिला नाईक रेहाना शेख यांनी रायगड जिल्ह्यातील धामणी गावातील ज्ञानाई माध्यमिक विद्यालयातील ५० विद्यार्थ्यांना दत्तक घेतले आहे.

करोनामुळे विविध भागांत अनेक अडचणी निर्माण झाल्या असून ग्रामीण भागातल्या समस्यांही वाढल्या आहेत. अशावेळी तिथल्या शाळांच्या विद्यार्थ्यांनाही अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. ही स्थिती लक्षात येताच शेख यांनी तातडीने ज्ञानाई माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचे ठरविले. शेख यांच्या मुलीचा वाढदिवस करोनामुळे साजरा होऊ शकला नाही. त्यावेळी त्यांनी मुलीच्या वाढदिवसानिमित्त ज्ञानाई शाळेतील विद्यार्थ्यांना हातमोजे, सॅनिटायझर, मास्क, बिस्किटे, भेटवस्तू आदी वस्तू पाठविल्या. त्यानंतर त्यांनी या विद्यार्थ्यांची करुण स्थिती दर्शविणारी काही छायाचित्रे पाहिली आणि त्या अस्वस्थ झाल्या. या मुलांना मदतीची आवश्यकता असल्याचे लक्षात येताच लगेचच या विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. विपरित परिस्थितीतही या विद्यार्थ्यांची शिक्षणाची जिद्द कमालीची असल्याचेही त्यांनी सांगितले. शेख यांच्या निर्णयाचे ज्ञानाई माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आनंदी दिवकर कोळी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष महादेवबुवा शहाबाजकर यांनी आभार मानले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज