अ‍ॅपशहर

गोविंदा पथकांतील ८६ गोविंदा जखमी

सुरक्षित गोविंदाची हमी देणाऱ्या मुंबईतील गोविंदा पथकांतील एकूण ८६ गोविंदा सोमवारी दहीहंडी फोडताना जखमी झाले. जखमी गोविंदांपैकी ३७ गोविंदांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

Maharashtra Times 4 Sep 2018, 4:00 am
४८ गोविंदा रुग्णालयांतून घरी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम govinda-injured


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

सुरक्षित गोविंदाची हमी देणाऱ्या मुंबईतील गोविंदा पथकांतील एकूण ८६ गोविंदा सोमवारी दहीहंडी फोडताना जखमी झाले. जखमी गोविंदांपैकी ३७ गोविंदांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या गोविंदांची प्रकृती स्थिर असून आतापर्यंत ४८ गोविंदांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. जखमी झालेल्या गोविंदाच्या नाकाला, कपाळाला जखमा होत्या, तर हातापायांच्या हाडांनाही पडल्यामुळे दुखापती होत्या. गोविंदा पथकांनी त्यांना उपचारासाठी ठिकठिकाणच्या पालिका तसेच सार्वजनिक रुग्णालयामध्ये नेण्यात आले आहे. जखमी गोविंदांना दहीहंडी फोडताना इजा झाल्याचे मात्र काही पथक तसेच कुटुंबीयांनी मान्य केलेले नाही.

जखमी गोविंदांमध्ये कुलाबा येथील नऊ वर्षांचा वेद कुलाबकर या गोविंदाला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जेजे रुग्णालयामध्ये आणण्यात आले. दहीहंडी लावताना पहिल्या थरावरून पडलेल्या वेदच्या डाव्या डोळ्याला इजा झाल्यामुळे तीन टाके घालण्यात आले. त्याचा डोळाही सुजला होता. टाके घातल्यानंतर वेदला रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. वेदचे काका प्रशांत कुलाबकर यांनी वेदची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगितले. तसेच वेद हा गोविंदा पथकात नव्हता; तर इतर मुलांसोबत खेळताना त्याला इजा झाल्याचे त्यांचे म्हणणे होते.

जेजे रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झालेला सचिन गायकवाड हा माटेगाव मित्र मंडळातील गोविंदा पथकामध्ये सहभागी झाला होता. त्याचा उजवा पाय मुरगळून पायाला दुखापत झाली. चालताना त्रास होत होता. गोविंदा पथकाने त्याला जेजे रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले होते. प्राथमिक उपचारानंतर त्याचा वैयक्तिक विमा असल्यामुळे सचिनने खासगी रुग्णालयामध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्याच्या गोविंदा पथकाने मटाला सांगितले. तर घाटकोपर येथील ३७ वर्षीय रवींद्र कांबळे यांच्या कपाळाला मार लागला होता, उपचारानंतर त्यांनाही रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहिती जेजे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी दिली.

०० सेंट जॉर्ज रुग्णालयात सात वर्षाचा मुलगा दाखल

सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये सात वर्षांच्या गोविंदावर उपचार करून त्याला संध्याकाळी घरी सोडण्यात आले. ध्रुव म्हात्रे असे या सात वर्षाच्या गोविंदाचे नाव असून त्याला दहीहंडीमध्ये खेळताना नाकाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला उपचारासाठी आणण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी दिली. सेंट जॉर्जमध्ये आज एकूण पाच गोविंदा उपचारासाठी आल्याचे त्यांनी सांगितले.

०० जखमी गोविंदांची आकडेवारी

केईएम रूग्णालय- ९

नायर रूग्णालय- १

लो. टिळक रूग्णालय- १

एस.एल रहेजा रूग्णालय- १

एम.टी अग्रवाल रूग्णालय- ३

राजावाडी रूग्णालय- १

ट्रॉमा केअर रुग्णालय- ४

महात्मा फुले रूग्णालय- १

व्ही.एन. देसाई रूग्णालय- ४

भाभा रूग्णालय- ५

शताब्दी रूग्णालय- २

सेंट जॉर्ज रुग्णालय- ४

जी.टी रुग्णालय - १

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज