अ‍ॅपशहर

​ १८ हजार कोटींचा आरे कारशेड घोटाळा

‘मेट्रोच्या कारशेडसाठी आरे येथील ३० हेक्टर जमीन संपादित करण्यामागे मुंबईतील बड्या बिल्डरांचे उखळ पांढरे करण्याचा डाव असून हा १८ हजार कोटींचा घोटाळा आहे. तसेच या घोटाळ्याला मुख्यमंत्र्याचा आशीर्वाद आहे’, असा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मंगळवारी केला.

Maharashtra Times 23 Aug 2017, 1:03 am
मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद असल्याचा निरुपम यांचा आरोप
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aarey metro carshed 18000 crore scam accuses sanjay nirupam
​ १८ हजार कोटींचा आरे कारशेड घोटाळा


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

‘मेट्रोच्या कारशेडसाठी आरे येथील ३० हेक्टर जमीन संपादित करण्यामागे मुंबईतील बड्या बिल्डरांचे उखळ पांढरे करण्याचा डाव असून हा १८ हजार कोटींचा घोटाळा आहे. तसेच या घोटाळ्याला मुख्यमंत्र्याचा आशीर्वाद आहे’, असा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मंगळवारी केला.

‘देशभरातील विविध मेट्रो कारशेडना १० ते १२ हेक्टरच जागा लागत असताना व दिल्लीतील सर्वात मोठ्या कारशेडला साडेसतरा हेक्टर जागा लागली असताना आरे येथे ३० हेक्टर जागेची गरजच काय’, असा सवाल निरुपम यांनी केला. ‘या ३० हेक्टरमधील कमीत कमी १२ हेक्टर जागा ही मुंबईतील बड्या बिल्डरांच्या घशात घालण्यात येणार असून, चारचा एफएसआय देऊन येथे १८ हजार कोटी रुपये कमविण्यात येतील’, असे निरुपम म्हणाले.

‘मुंबईच्या प्रमुख वर्तमानपत्रात भाजपा सरकारने मेट्रो आरे यार्डसंदर्भात जाहिरात दिली आहे, त्यामध्ये सरकारने सात खोटे मुद्दे मांडलेले आहेत’, असे निरुपम म्हणाले. ‘मुंबईत या मेट्रो यार्डसाठी कांजुरमार्ग, महालक्ष्मी रेसकोर्स, कुलाबा, मुंबई विद्यापीठाचा कलिना कॅम्पस येथे जागा उपलब्ध असताना केवळ बिल्डरांच्या भल्यासाठी आरे येथे मेट्रो यार्ड तयार करण्याचा घाट घातला जात आहे’, असे ते पुढे म्हणाले. ‘आरेतील कारशेडची जागा ही वनजमीन नसून ती डेरी डेव्हलपमेंट बोर्डाची आहे, असे सरकारने या जाहिरातीत म्हटले आहे. मात्र, ते साफ खोटे आहे. ही जागा वन विभागाचीच आहे’, असे निरुपम म्हणाले. ‘आम्ही आरेच्या जागेचा अभ्यास केल्याचे सरकारी जाहिरातीत म्हटले आहे. मात्र, या सरकारने कुलाबा, महालक्ष्मी रेसकोर्स, कांजुरमार्ग आणि कालिना येथील जागेचा कधी अभ्यास केलेला नसताना सरकारने आरेचा अभ्यास कधी केला? या संदर्भात माहिती मागितल्यास सरकारकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही’, असे ते पुढे म्हणाले. ‘सीआरझेड आणि एनजीटी यांच्याकडून आरे यार्डसाठी परवानगी मिळाल्याचे जाहिरातीत म्हटल्याचे खोटे आहे. या दोन्ही विभागांकडून अजूनही परवानगी मिळालेली नाही. तसेच कारशेडसाठी ३५०० झाडे कापण्याची परवानगीही मिळालेली नाही’, असा दावा निरुपम यांनी केला.

‘व्यावसायिक वापरासाठी बांधकाम होणार नाही, असेही या जाहिरातीत म्हटले आहे. परंतु, पुढे याच जाहिरातीत स्पोर्ट्‍स कॉम्प्लेक्स, सांस्कृतिक सेंटर, स्टेड‌ियम, हाऊसिंग, कमर्शिअल, थीम पार्क व प्राणी संग्रहालय बांधण्याचा उल्लेख का केलेला आहे’, असा सवालही निरुपम यांनी केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज