अ‍ॅपशहर

गुड न्यूज! जून महिन्यात दोन नव्या एसी लोकल, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर फेऱ्या वाढणार

मध्ये रेल्वेच्या प्रवाशांसाठी आणखी एक चांगली बातमी आहे. वातानुकूलित (एसी) लोकलच्या तिकीटदरात घट झाल्यानंतर आता आणखी एक दिलासा मुंबई महानगर प्रदेशातील रेल्वे प्रवाशांना मिळणार आहे.

Authored byमहेश चेमटे | महाराष्ट्र टाइम्स 1 May 2022, 9:25 am
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण/कसारा/कर्जत या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. जून महिन्यात दोन नवीन एसी लोकल आल्यानंतर प्रवाशांसाठी वाढीव फेऱ्या सुरू होतील.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ac local train mumbai central line
गुड न्यूज! जून महिन्यात दोन नव्या एसी लोकल, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर फेऱ्या वाढणार


प्रत्येकी सहा वातानुकूलित लोकल मध्य आणि पश्चिम रेल्वेला देण्याच्या सूचना रेल्वे मंडळाने चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीला दिल्या होत्या. सध्या मध्य रेल्वेकडे चार आणि पश्चिम रेल्वेकडे सहा वातानुकूलित लोकल देण्यात आलेल्या आहेत. शेवटच्या दोन वातानुकूलित लोकलची बांधणी सध्या सुरू आहे. ही बांधणी पूर्ण झाल्यानंतर या लोकल मध्य रेल्वेसाठी रवाना करण्यात येणार आहेत.

मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात मध्य रेल्वेच्या ताफ्यात दोन नव्या वातानुकूलित लोकल दाखल होणार आहेत. सध्या सेवेत असलेल्या लोकलच्या धर्तीवर या गाड्या असल्याने त्याची पुन्हा चाचणी होणार नाही. या गाड्या थेट मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर प्रवासी सेवेत दाखल करण्यात येणार आहेत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात एकूण पाच वातानुकूलित लोकल गाड्या आहेत. यापैकी दोन सेवेत असून एक आपत्कालीन स्थितीसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे. उर्वरित दोन रेल्वेगाड्यांमध्ये देखभालीची कामे सुरू आहेत. मध्य रेल्वेवर पाच रेल्वे गाड्या आहेत. ठाणे-दिवा दरम्यान पाचवी-सहावी मार्गिका सुरू केल्यानंतर वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढवण्यासाठी एक गाडी पश्चिम रेल्वेकडून घेण्यात आली आहे. दोन नव्या लोकल दाखल झाल्यानंतर मध्य रेल्वेवरील एक लोकल पश्चिम रेल्वेकडे सुपूर्द करण्यात येईल.

प्रथम श्रेणी प्रवासीही एसीकडे वळतील

वातानुकूलित लोकलचे तिकीट निम्मे केल्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद वाढेल. प्रथम श्रेणी तिकीटदराच्या तुलनेत वातानुकूलित लोकलचे तिकीटदर थोडेसेच अधिक आहेत. यामुळे प्रथम श्रेणीचे प्रवासीदेखील वातानुकूलित लोकलकडे वळतील, असा रेल्वे अधिकाऱ्यांचा दावा आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज