अ‍ॅपशहर

‘जलयुक्त शिवार’ची एसीबी चौकशी

राज्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांतील कथित भ्रष्टाचाराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्यात यावी, असे निर्देश सभापती रामराजे नाइक निंबाळकर यांनी सोमवारी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिले. २४ जून रोजी राखून ठेवलेल्या प्रश्नावर झालेल्या चर्चेवेळी सभापतींनी हे निर्देश दिले.

महाराष्ट्र टाइम्स 2 Jul 2019, 4:00 am
कथित भ्रष्टाचाराप्रकरणी विधान परिषदेच्या सभापतींचे निर्देश
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalyukta-shivar


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

राज्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांतील कथित भ्रष्टाचाराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्यात यावी, असे निर्देश सभापती रामराजे नाइक निंबाळकर यांनी सोमवारी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिले. २४ जून रोजी राखून ठेवलेल्या प्रश्नावर झालेल्या चर्चेवेळी सभापतींनी हे निर्देश दिले.

जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांबाबत जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या उत्तरामुळे सभागृहातील सदस्यांचे समाधान न झाल्यामुळे त्यादिवशी हा प्रश्न राखून ठेवण्यात आला होता. सोमवारी या प्रश्नाच्या चर्चेत सहभागी सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन सभापतींनी हे निर्देश दिले. जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचाराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे सदस्य हेमंत टकले, विद्या चव्हाण यांनी केली होती.

२४ जून रोजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुरंदर तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचाराची माहिती सभागृहात दिली होती. त्यावेळी संबंधित मंत्र्यांनी भ्रष्टाचार झाल्याची कबुलीही दिली होती. मात्र या प्रश्नावर सभागृहात गोंधळ निर्माण झाल्याने हा प्रश्न राखून ठेवण्यात आला होता. पुरंदर तालुक्यातील कामांच्या भ्रष्टाचाराची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येऊ नये, असा अहवाल जलसंधारण विभागास सादर झाल्याची माहिती टकले यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली होती.

यावेळी जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न सभागृहात केला. मात्र कॅबिनेट मंत्री उपस्थित असताना राज्यमंत्री कसे काय उत्तर देऊ शकतात, असा सवाल करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी गोंधळ घातल्यामुळे सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज