अ‍ॅपशहर

जितेंद्र नवलानी यांच्यावर गुन्हा, ५८ कोटींहून अधिकची रक्कम वसूल केल्याचा आरोप

व्यावसायिक जितेंद्र नवलानी यांच्याविरोधात एसीबी गुन्हा दाखल केला आहे. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनंतर नवलानी प्रकाशझोतात आले होते.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 6 May 2022, 7:57 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह प्रकरण, राज्यातील ईडीचे छापासत्र आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनंतर प्रकाशझोतात आलेले व्यावसायिक जितेंद्र नवलानी यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल केला. ईडी अधिकाऱ्यांच्या नावाने कारवाईची भीती दाखवून नवलानी यांनी ५८ कोटींपेक्षा जास्त रक्कम वसूल केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. विशेष म्हणजे, बनावट कंपन्यांमधून हे पैसे स्वतःच्या मालकीच्या कंपन्यांमध्ये वळविल्याचे एसीबीच्या प्राथमिक तपासातून समोर आले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम acb registers case against jitendra navlani
जितेंद्र नवलानी यांच्यावर गुन्हा, ५८ कोटींहून अधिकची रक्कम वसूल केल्याचा आरोप


जितेंद्र नवलानी हे ईडीचे अधिकारी म्हणून वावरत असून खंडणी उकळत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. गावदेवी येथील पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांनी नवलानी यांच्या पबवर कारवाई केल्यामुळे डांगे यांना निलंबित करण्यात आले. पुन्हा सेवेत घेण्यासाठी परमबीर सिंह यांनी पैसे मागितले, असा आरोप डांगे यांनी केला होता. याचबरोबर नवलानी यांच्याविरोधात एसीबीकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. या सर्व तक्रारींची एसीबीकडून प्राथमिक चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये नवलानी आणि त्यांच्या इतर साथीदारांनी विविध खासगी कंपन्यांकडून ईडी अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून सन २०१५ ते २०२१ या कालावधीत तब्बल ५८ कोटी ९६ लाख रुपये स्वीकारल्याचे समोर आले आहे. हे पैसे वेगवेगळ्या नावांनी सुरू करण्यात आलेल्या बनावट कंपन्यांच्या खात्यांवर भरण्यात आले आणि त्यानंतर फी स्वरूपात ते नवलानी यांनी स्वतःच्या मालकीच्या कंपन्यांमध्ये वळविले. प्राथमिक तपासामध्ये हे पैसे गैरमार्गाने स्वीकारल्याचे दिसून येत असल्याने एसीबीने नवलानी यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ कलम ८ व कलम ७ अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज