अ‍ॅपशहर

अमोल कोल्हे थेट शाहांच्या भेटीला, रोहित पवारांचं 'जय श्रीराम'; राष्ट्रवादीच्या भूमिकेची चर्चा

Maharashtra Politics | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी रावण दहन कार्यक्रमानिमित्त 'जय श्रीराम' असे ट्वीट केले आहे. येत्या ३ ऑक्टोबरला जामखेड तालुक्यातील खर्डा येथे महाराष्ट्रातील सर्वात उंच रावण दहनाचा कार्यक्रम रोहित पवार यांनी आयोजित केला आहे. रामायण मालिकेत सीतेची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया या खर्डा येथे रावण दहन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स 2 Oct 2022, 7:06 am
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: राज्यात सध्या शिवसेनेच्या दोन गटांच्या दसरा मेळाव्यावरून वातावरण तापलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैचारिक भूमिकेबाबत चर्चा रंगली आहे. त्यासाठी कारण ठरले ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतलेली भेट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दसऱ्याला त्यांच्या मतदारसंघात होणाऱ्या रावण दहनानिमित्ताने 'जय श्रीराम' असे केलेले ट्वीट. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये शनिवारी उलटसुलट चर्चा सुरू होत्या.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Rohit Pawar Amol Kolhe
रोहित पवार आणि अमोल कोल्हे


सत्ताकारणातील भाजपचे चाणक्य, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. अमोल कोल्हे यांनी नुकतीच भेट घेतल्याच्या तसेच आमदार रोहित पवार यांच्या 'जय श्रीराम' या घोषणेच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय वैचारिक भूमिकेबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी याबाबत भाष्य करण्याचे टाळून मौनव्रत धारण केल्याचे दिसते.

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेतील दोन गट एकमेकांवर शाब्दिक हल्ले चढवत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका खासदाराने चित्रपटाच्या निमित्ताने भाजप नेते अमित शहा यांची घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.

काही महिन्यांपूर्वी अमोल कोल्हे यांनी एका चित्रपटात नथुराम गोडसे यांची भूमिका साकार केली होती. राजकारण आणि कलाकार ही दोन्ही वेगळी क्षेत्रे असल्याचे सांगून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांची पाठराखण केली होती. मात्र महाविकास आघाडीचे सरकार असताना अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी व्हावी, असे ट्वीट केल्यावर शरद पवार यांनी पार्थ यांच्या मताला आपण कवडीइतकीही किंमत देत नाही, असे म्हटले होते. त्यामुळे कोल्हे यांच्या भेटीवर तसेच रोहित पवार यांच्या ट्वीटवर शरद पवार आता कोणती भूमिका घेतात यावरून सोशल मीडियात अनेक तर्कवितर्क सुरू आहेत.

डॉ. अमोल कोल्हे यांचा 'शिवप्रताप गरुडझेप' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा येथून सुटकेवर हा चित्रपट बेतलेला आहे. त्या ऐतहासिक चित्रपटाचे प्रमोशन अमोल कोल्हे सध्या करीत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने आपण अमित शहा यांची भेट घेतली असल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे. या भेटीचे छायाचित्रही त्यांनी सोशल मीडियावर टाकले आहे. उभयतांमध्ये यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघातील नियोजित पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प, शिवसंस्कार सृष्टी आणि इंद्रायणी मेडीसिटी याविषयी सकारात्मक चर्चा झाली, असे कोल्हे यांचे म्हणणे आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैचारिक भूमिकेचा एकंदरीतच गोंधळ असून, त्या पक्षातील पुणे जिल्ह्यातील या खासदाराचे वर्तन आणि भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीला केलेले लक्ष्य याचा ताळमेळ दिसत नसल्याचे राष्ट्रवादीत बोलले जात आहे.

भाजपशी जवळीक?

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी रावण दहन कार्यक्रमानिमित्त 'जय श्रीराम' असे ट्वीट केले आहे. येत्या ३ ऑक्टोबरला जामखेड तालुक्यातील खर्डा येथे महाराष्ट्रातील सर्वात उंच रावण दहनाचा कार्यक्रम रोहित पवार यांनी आयोजित केला आहे. रामायण मालिकेत सीतेची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया या खर्डा येथे रावण दहन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. याआधी रोहित पवार यांनी अयोद्धा दौरा केला होता. रोहित पवार यांची भूमिका भाजपच्या जवळपास जाणारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

महत्वाचे लेख