अ‍ॅपशहर

Devendra Fadanvis Speech: राजकारणात अजितदादांच्या प्रेमाची दादागिरी चालते; फडणवीसांकडून तोंडभरून कौतुक

Devendra Fadanvis On AJit Pawar : विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांची निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

Authored byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jul 2022, 5:54 pm
मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना बंडखोर आमदार आणि भाजप यांच्या युतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोधी पक्षात बसावं लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. याबाबत अजित पवार यांचे अभिनंदन करताना भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी स्तुतीसुमने उधळली आहेत.

'अजितदादांनी शरद पवार यांचे पुतण्या यापलीकडे जाऊन राज्याच्या राजकारणात स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांचा राजकीय प्रवास मोठा आहे. राष्ट्रवादीच्या घडाळ्याचा काटा सव्वा दहावर स्थिर आहे, पण अजित दादा वक्तशीर आहेत. ते रोखठोकपणे बोलतात, दिलेला शब्द पूर्ण करतात,' अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांचं कौतुक केलं आहे.

'आम्ही ७२ तासांचे सहकारी'

विरोधी पक्षनेते निवड झाल्याबद्दल अजित पवार यांचं अभिनंदन करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये घडलेल्या राजकीय नाट्यावरही भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्रितपणे सरकार स्थापन केलं होतं. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, 'अजितदादा म्हणजे राज्यातलं वादळी नेतृत्व. आमचे चांगले संबंध आहेत. मंत्रिमंडळात आम्ही ७२ तासांचे सहकारी होतो. आमचं तेव्हाच ठरलं होतं, अडीच वर्षानंतर तुम्ही इकडे बसा, मी तिकडे बसतो,' अशी टोलेबाजी फडणवीसांनी केली.
लेखकाबद्दल
अक्षय शितोळे
अक्षय शितोळे, २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय.... आणखी वाचा

महत्वाचे लेख