अ‍ॅपशहर

विकृत दाम्पत्याचे अल्पवयीन मुलींवर अत्याचार

घरकामाच्या बहाण्याने जुहू येथील १४ वर्षांच्या मुलीला मिरा रोड येथे नेऊन एका बांधकाम व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीने मिळून या मुलीवर तीन दिवस लैंगिक अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे.

Maharashtra Times 10 Aug 2018, 12:51 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rape


घरकामाच्या बहाण्याने जुहू येथील १४ वर्षांच्या मुलीला मिरा रोड येथे नेऊन एका बांधकाम व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीने मिळून या मुलीवर तीन दिवस लैंगिक अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डी. एन. नगर पोलिसांनी या दोघांसह त्यांना मुली पुरवणाऱ्या एका विधवा महिलेला अटक केली आहे. दाम्पत्याने अशा प्रकारे दोन मुलींवर अत्याचार केल्याचे उघड झाले असून, त्यापैकी एक या विधवा महिलेचीच मुलगी आहे.

आपल्या विकृत वासना शमवण्यासाठी दाम्पत्याने या विधवा महिलेला हाताशी धरले होते. एक अल्पवयीन मुलगी पाठवल्यास ते या महिलेला दिवसाचे अडीच हजार रुपये देत होते. सुरुवातीला या महिलेने आपल्याच सोळा वर्षांच्या मुलीलाच या दाम्पत्याच्या घरी पाठवले. हा व्यावसायिक आपल्या पत्नीसमोरच मुलीशी लैंगिक चाळे करत असे. आईकडे तक्रार करूनही ती काहीच करत नसल्याने मुलगी हतबल झाली होती. 'पोलिसांत गेलीस तर मारून टाकू' अशी धमकी दिलेली असल्याने ती या दाम्पत्याचे अत्याचार निमूटपणे सहन करत होती.

या मुलीचा कंटाळा आल्यानंतर या व्यावसायिकाने विधवा महिलेकडे आणखी एका मुलीची मागणी केली. रोजचे अडीच हजार मिळणार म्हणून महिलेने आपल्या मुलीच्याच १४ वर्षांच्या मैत्रिणीला घरकामाच्या बहाण्याने या व्यावसायिकाकडे पाठविले. त्या मुलीला घेऊन हे दाम्पत्य २१ जुलै रोजी त्यांच्या मिरा रोड येथील फ्लॅटमध्ये गेले. तीन दिवस तेथे या दोघांनी मुलीवर अमानुष लैंगिक अत्याचार केले.

दोन दिवस 'ती' घरीच परतली नाही

मुलगी घरी परतली नाही म्हणून तिच्या आईने डी. एन. नगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. याबाबतची माहिती विधवा महिलेने व्यावसायिकाला दिली. पोलिस घरी येतील या भीतीने दाम्पत्याने त्या मुलीला सोडून दिले. मात्र, अमानुष अत्याचार झाल्याने मुलीच्या मनावर जबरदस्त आघात झाला. आता कोणाला तोंड कसे दाखवणार या विचाराने तिने २३ जुलैची रात्र अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ तर, २४ जुलैचा दिवस एका बागेत काढला. पण, वेदना असह्य होत असल्याने ती घरी परतली आणि घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. आईने याबाबत डी. एन. नगर पोलिसांना कळविले. पोलिसांनी अपहरण आणि पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करून या दाम्पत्यासह जुहूतील विधवा महिलेलाही अटक केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज