अ‍ॅपशहर

दिव्यांगांसाठी लेखिनकांची बँक

चौदा वर्षीय 'अध्ययन अक्षम' असलेल्या दिव्यांशू जेधे या विद्यार्थ्याला परीक्षेसाठी लेखनिक मिळावा यासाठी त्यांच्या पालकांनी परवानगी मागितली. ही परवानगी त्यांना मिळाली. मात्र, लेखनिक काही मिळेना. अखेर भरपूर शोध घेतल्यानंतर दिव्यांशूच्या एका मित्राने लेखनिक म्हणून काम करण्याची तयारी दर्शविली. याचवेळी त्याची आई अमिशा हिने या समस्येवर तोडगा काढण्याचा निश्चय केला आणि कामाला सुरुवात केली.

महाराष्ट्र टाइम्स 13 Oct 2019, 2:20 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: चौदा वर्षीय 'अध्ययन अक्षम' असलेल्या दिव्यांशू जेधे या विद्यार्थ्याला परीक्षेसाठी लेखनिक मिळावा यासाठी त्यांच्या पालकांनी परवानगी मागितली. ही परवानगी त्यांना मिळाली. मात्र, लेखनिक काही मिळेना. अखेर भरपूर शोध घेतल्यानंतर दिव्यांशूच्या एका मित्राने लेखनिक म्हणून काम करण्याची तयारी दर्शविली. याचवेळी त्याची आई अमिशा हिने या समस्येवर तोडगा काढण्याचा निश्चय केला आणि कामाला सुरुवात केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम writters


अमिषा यांनी एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आणि या ग्रुपमध्ये अध्ययन अक्षम असलेल्या विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक, समुपदेशक यांना जोडून घेतले. या विद्यार्थ्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत, त्यांना लेखनिक का मिळत नाही, याबद्दल या ग्रुपवर चर्चा करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्या असे लक्षात आले की ही समस्या अनेक पालकांना जाणवते. यासाठी त्यांनी दिव्यांशूच्या क्लासच्या शिक्षिका आचल केसवानी यांची मदत घेतली आणि त्या सुमारे ३५ पालकांपर्यंत पोहोचल्या. या ग्रुपमध्ये ठाणे, मुलुंड आणि अंधेरी येथील पालकांचा समावेश आहे.

केसवानी या विद्यार्थ्यांना स्वेच्छेने लेखनिक म्हणून काम करण्यासाठी तयार करत आहेत. २०१७मध्ये लेखनिकांची एक बँक तयार करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र त्याला फारसे यश आले नाही. इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांपेक्षा प्रादेशिक भाषांमधील विद्यार्थ्यांना लेखनिक मिळताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे जास्तीत जास्त लेखनिकांची यादी एकत्रित असावी, अशी अनेक पालकांची मागणी आहे. मात्र यासाठी फारसे कोणी प्रयत्न करताना दिसत नाही. यामुळे आता अमिषा यांनी पुढाकार घेतला आहे. येत्या काळात इच्छुक लेखनिकांची यादी करून त्यांनाही व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून जोडून घेतले जाणार असल्याचे त्या म्हणाल्या. याचबरोबर शिक्षक, पालक यांच्याशी संवाद साधून विविध कार्यशाळांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना लेखनिक का महत्त्वाचा आहे, तसेच लेखनिकाची भूमिका किती महत्त्वाची आहे हे पटवून दिले जाणार आहे. याचबरोबर येत्या काळात एक वेबसाइट तयार करून या माध्यमातून लेखनिकांची यादी आणि त्यांचा तपशील तयार करण्याचा मानस असल्याचेही अमिषा यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज