अ‍ॅपशहर

उघडे मॅनहोल म्हणजे मृत्यूचे सापळे! न्यायालयाची नाराजी, तत्काळ उपाय करण्याचे निर्देश

‘उघडे मॅनहोल म्हणजे मृत्यूचे सापळे आहेत. त्यामुळे २८ नोव्हेंबरपर्यंत मुंबईत कुठेही असे उघडे मॅनहोल असतील तर ते बंद करा आणि १ डिसेंबरला त्याचा कृती अहवाल द्या’, असा आदेश खंडपीठाने दिला.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 28 Nov 2022, 6:13 am
मुंबई : ‘रस्ते व फूटपाथवरील उघडे मॅनहोल म्हणजे मृत्यूचे सापळे आहेत’, असे नमूद करत मुंबईतील अशा प्रकारांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी नाराजी व्यक्त केली. तसेच असे मॅनहोल तात्काळ बंद करण्याबाबत योग्य ती पावले उचलण्याचे निर्देशही मुंबई महापालिकेला दिले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम manhole
उघडे मॅनहोल म्हणजे मृत्यूचे सापळे! न्यायालयाची नाराजी, तत्काळ उपाय करण्याचे निर्देश


खराब रस्त्यांच्या प्रश्नावर तसेच उघड्या मॅनहोलबाबत उच्च न्यायालयाने सविस्तर निकालाद्वारे अनेक निर्देश देऊनही त्यांचे पालन मुंबईसह अनेक शहरांत होत नसल्याबद्दल अॅड. रूजू ठक्कर यांनी राज्य सरकार व सरकारी प्रशासनांविरोधात न्यायालय अवमान याचिका केली आहे. त्यावर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. अभय अहुजा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी ‘पूर्व द्रुतगती महामार्गावर जवळपास ३०० मॅनहोल उघडे असून त्याबाबत प्रशासनांकडे अनेकदा तक्रारी करूनही एकही मॅनहोल बंद करण्यात आले नाही’, असा दावा ठक्कर यांनी केला. तेव्हा, खरेच अशी परिस्थिती आहे का, याची शहानिशा करण्याचे निर्देश खंडपीठाने पालिकेच्या वकिलांना दिले. त्याचवेळी ‘उघडे मॅनहोल म्हणजे मृत्यूचे सापळे आहेत. त्यामुळे २८ नोव्हेंबरपर्यंत मुंबईत कुठेही असे उघडे मॅनहोल असतील तर ते बंद करा आणि १ डिसेंबरला त्याचा कृती अहवाल द्या’, असा आदेश खंडपीठाने दिला.

तीन फुटी मॅनहोल धोकादायक नाहीत का?

वसईमध्ये काही दिवसांपूर्वी उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्याचेही उदाहरण अॅड. ठक्कर यांनी देत त्याबाबतचे प्रसिद्ध झालेले वृत्त न्यायालयाला दाखवले. त्याबाबत उत्तर देताना वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत केवळ काही मॅनहोल उघडे असून ते तीन फुटांपेक्षा कमी उंचीचे आहेत, असे पालिकेच्या वकिलांनी सांगितले. त्यावर ‘तीन फूट उंचीचे मॅनहोल हे धोकादायक किंवा मृत्यूचे सापळे नाहीत, असे तुम्हाला म्हणायचे आहे का? अशा उघड्या मॅनहोलमध्ये पडून एखाद्या नागरिकाचा मृत्यू जरी झाला नाही तरी तो गंभीर जखमी होऊ शकतो’, असे खडे बोल खंडपीठाने सुनावले.

महत्वाचे लेख