अ‍ॅपशहर

एसटी बसने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; भाडेवाढीच्या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी

ST Bus Fare Hike: तिकीट दरात वाढ करत असताना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा राज्यभरात 'दिवाळी स्पेशल' १४९४ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Oct 2022, 1:33 pm
मुंबई : दिवाळी हा सण महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण आपल्या मूळ गावी जात साजरा करण्याकडे बहुतांश नागरिकांचा कल असतो. परिणामी सार्वजनिक वाहतूक साधनांना या काळात प्रचंड मागणी असते. एसटी बसमध्येही या काळात गर्दी ओसंडून वाहत असते. अशातच काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळाने गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने एसटी प्रवासासाठी १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची आज मध्यरात्रीपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम st bus tickets
एसटी बस


एसटी महामंडळाकडून करण्यात आलेली ही भाडेवाड ३१ ऑक्टोबर, २०२२ पर्यंत कायम राहणार असून सदर भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) व शयन आसनी बसेसला लागू राहील. शिवनेरी व अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही.

Hingoli : ऐन दिवाळीत पाऊस, आसना नदीला पूर आल्याने हिंगोलीत शेकडो एकर शेती पुराच्या पाण्यात

नेमका काय आहे एसटी महामंडळाचा निर्णय?

एसटी महामंडळाकडून साधारणपणे ५ ते ७५ रुपयांपर्यंत भाडेवाढ होणार आहे. ज्या प्रवाशांनी एसटी प्रवासासाठी आगाऊ आरक्षण केलं आहे , त्या प्रवाशांकडून वाहकाद्वारे आरक्षण तिकीट दर व नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येईल. तथापी, ही भाडेवाढ एस.टी.च्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक/त्रैमासिक व विद्यार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही. १ नोव्हेंबरपासून भाडेवाढ संपुष्टात येऊन, नेहमीप्रमाणे तिकीट दर आकारले जातील, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे.

खरेदीदारांनी सावरला बाजार; सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या चिन्हात, बँक शेअर्समध्ये वाढ कायम

दिवाळीत एसटी महामंडळ अतिरिक्त गाड्या सोडणार

दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांचा कालावधी पाहता कुटुंबीय आणि मित्र परिवारासह पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा राज्यभरात 'दिवाळी स्पेशल' १४९४ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २१ ऑक्टोबरते ३१ ऑक्टोबर या दरम्यान अतिरिक्त गाड्या धावणार आहेत, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे.

महत्वाचे लेख