अ‍ॅपशहर

मोदी है तो मुंबई भी मुमकिन है... भाजपनं दिले पुढील संघर्षाचे संकेत

पाच पैकी राज्यांतील निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर महाराष्ट्रातील भाजप (BJP) नेते अधिकच आक्रमक झाले असून सत्ताधारी शिवसेनेवर (Shiv Sena) टीकेची झोड उठवली आहे.

Edited byगणेश कदम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Mar 2022, 6:05 pm
मुंबई: विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशानंतर पक्षाच्या प्रदेश कार्यालयासमोर आज ढोलताशांचा गजर करत जल्लोष करण्यात आला. या विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देताना भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) विशेषत: शिवसेनेवर तोफ डागली आहे. 'मोदी है तो मुंबई भी मुमकिन है', अशी प्रतिक्रिया देत भाजप नेते अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पुढील संघर्षाचे संकेत दिले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Narendra Modi
नरेंद्र मोदी


वाचा: 'महाराष्ट्र अभी बाकी है' असं म्हणणाऱ्यांना शरद पवारांचं कडक उत्तर

यूपीसह चार राज्यांत मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व गोव्याच्या यशाची रणनीती आखणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचंही शेलार यांनी अभिनंदन केलं. शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. '२०२४ साली दिल्लीच्या खुर्चीत बसणार... उत्तर प्रदेश, गोव्यात बघा आम्ही करून दाखवतो... उत्तर प्रदेशात युवराजांची अती विराट सभा... झंझावाती दौरा... असं म्हणत बोरुबहाद्दर मोठ्या वल्गना करीत होते. पण सगळ्या बुडबुड्यांचे निकाल लागले...अतिप्रचंड मतांनी झंझावाती डिपॉझिट गुल होऊन शिवसेना हरली. 'एक मासो आणि खंडी भर रस्सो' अशी शिवसेनेची अवस्था असल्याचा टोला शेलार यांनी मालवणी भाषेत हाणला. नोटापेक्षाही कमी मते घेऊन शिवसेना पराभूत झाली आहे, हेही त्यांनी अधोरेखित केले. गोरखपूरमध्ये सभा घेऊन गोरखपूर बदलायला गेले होते. जे मुंबईचे गोरेगाव बदलू शकले नाहीत, ते गोरखपूर काय बदलणार? असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

वाचा: मोदींना कोणीच टक्कर देऊ शकत नाही, कारण... निकाल येताच भाजप नेत्याचं मोठं विधान

आशिष शेलार यांनी ट्वीटच्या माध्यमातूनही शिवसेनेवर तिरकस टीका केली आहे. 'अरविंद केजरीवाल यांचा आता बहुतेक शिवसेना भवनात जंगी सत्कार होईल. शिवाजी पार्कमध्ये हत्तीवरून युवराज साखर सुद्धा वाटतील. शेजाऱ्यांच्या घरात पाळणा हलला की, पेढे वाटपाचे कार्यक्रम करून दाखवले जातात. आपले नाही धड अन् शेजाऱ्याचा कढ, अशा शब्दांत टीका केली आहे.

महत्वाचे लेख