अ‍ॅपशहर

भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवली; नार्वेकर म्हणाले, यांना शिवबंधन बांधून टाका!

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह काही नेत्यांनी आज विधानभवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गाडी थांबवून त्यांना निवेदन दिलं. (BJP Leaders Stops CM Uddhav Thackeray's Car)

Authored byगणेश कदम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jun 2021, 5:22 pm
मुंबई: मागण्याचं निवेदन देण्यासाठी भाजपच्या काही नेत्यांनी आज चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गाडी अडवली. मुख्यमंत्र्यांनीही लगेचच गाडीतून उतरून त्यांचं निवेदन स्वीकारलं. यावेळी उपस्थित नेत्यांमध्ये हास्यविनोद रंगला. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी यावेळी भाजपच्या नेत्यांना शिवबंधन बांधण्याची भाषा केल्यानं वेगळीच चर्चा रंगली आहे. (BJP Leaders Stops CM Uddhav Thackeray's Car)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Uddhav Thackeray


विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री ठाकरे आज विधानभवनात आले होते. ही बैठक आटोपून निघत असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन आणि आमदार प्रसाद लाड यांनी त्यांची गाडी अडवली. मुख्यमंत्र्यांनी लगेचच गाडी थांबवली आणि ते गाडीतून उतरले. भाजपच्या नेत्यांनी एक निवेदन मुख्यमंत्र्यांकडं दिलं. मुख्यमंत्र्यांनी त्यावर नजर टाकली आणि नेत्यांशी चर्चा सुरू केली.

वाचा: अमरनाथ यात्रा रद्द! काँग्रेसनं भाजपला दिलं 'हे' आव्हान

हे सगळं सुरू असतानाच मिलिंद नार्वेकर हे धावत पुढं आले. निवेदन घेण्यासाठी मुख्यमंत्री थांबल्याचं लक्षात येताच नार्वेकरही गप्पांध्ये सहभागी झाले. साहेब, या लोकांनी तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न केलाय का, असं नार्वेकर गमतीनं म्हणाले. त्यावर आम्ही केव्हाही येऊ शकतो असं प्रवीण दरेकर म्हणाले. दरेकरांच्या या उत्तरावर यांना आत्ताच कारमध्ये घ्या. शिवबंधन बांधूया असं नार्वेकर म्हणाले. दरेकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता, 'आम्ही केव्हाही एकत्र येऊ शकतो, हे आमचं मूळ आहे,' असं उत्तर दिलं. त्यावर पुन्हा एकदा हंशा पिकला.

मनमोकळ्या गप्पांनंतर मुख्यमंत्री पुन्हा जायला निघाले तेव्हा आम्हाला तुमच्या कारमध्ये घ्या, अशी विनंती भाजपच्या तिन्ही नेत्यांनी केली. मात्र, करोनाच्या नियमांमुळं एकालाच प्रवेश मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगताच, तिघांनीही दिलखुलास हसून त्यांना दाद दिली.

वाचा: 'भाजपनं आमच्याही कुटुंबाला त्रास दिला होता, पण...'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज