अ‍ॅपशहर

नालेसफाईची माहिती आता मोबाईलवर, मुंबईकरांना घरबसल्या मिळणार अपडेट, तक्रारीचीही सुविधा

Mumbai News: मुंबई महापालिकेने नालेसफाईचा डॅशबोर्ड तयार केला आहे. १ एप्रिलपासून हा डॅशबोर्ड सुरू होणार आहे. या डॅशबोर्डवर नागरिकांना नालेसफाईबाबतच्या तक्रारीही करता येणार आहेत.

Authored byम. टा. प्रतिनिधी | Edited byकिशोरी तेलकर | महाराष्ट्र टाइम्स 28 Mar 2024, 12:36 pm
मुंबई : महापालिकेच्या नालेसफाईवर समाजमाध्यमांमधून अनेक वेळा टीका केली जाते. त्यामुळे मुंबईकरांना याविषयी मोबाइलवर माहिती मिळावी, यासाठी महापालिकेने नालेसफाईचा डॅशबोर्ड तयार केला आहे. १ एप्रिलपासून हा डॅशबोर्ड सुरू होणार आहे. या डॅशबोर्डवर नागरिकांना नालेसफाईबाबतच्या तक्रारीही करता येणार आहेत. डॅशबोर्डवर नाल्याचे छायाचित्र टाकल्यास तातडीने कार्यवाही केली जाणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nalesafai AI
नालेसफाईची माहिती आता डॅशबोर्डवर


गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे दोन ते तीन आठवडे उशिरा, म्हणजे २३ मार्चपासून नालेसफाईची कामे सुरू झाली आहेत. एप्रिल अखेरपर्यंत ३५ टक्के, तर मे अखेरपर्यंत ४० टक्के असे एकूण ७५ टक्के गाळ उपसा करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे. आत्तापर्यंत लहान, मोठ्या नाल्यातील पाच टक्के, तर मिठी नदीतील ३५ टक्के गाळ उपसा करण्यात आला आहे. मुंबईत छोटे नाले, मोठे नाले आणि रस्त्यालगतच्या पर्जन्यवाहिन्या, पाणी निचरा होण्याच्या जागा यांमध्ये येणारी माती, कचरा, गाळ यामुळे अनेक वेळा पाणी भरण्याचे प्रकार घडतात. रस्त्यालगतच्या पर्जन्यजल वाहिन्यांतून काही प्रमाणात गाळ वाहून नेला जातो. मात्र छोट्या नाल्यांचा काही भाग समुद्राच्या भरती-ओहोटी भागात येत असल्यामुळे पाण्याचा निचरा न होता गाळ साचून राहतो व अतिवृष्टीत या नाल्यांतील पाणी शहरात जमा होते. त्यामुळे पालिकेतर्फे पावसाळ्याआधी नालेसफाईची कामे हाती घेण्यात येतात.

उद्दिष्ट गाठणार का?

दरवर्षी मार्चच्या सुरुवातीला नालेसफाई सुरू केली जाते. मात्र यंदा कामाचे लेखी आदेश उशिरा दिल्यामुळे नुकतीच कामाला सुरुवात झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर ३१ मे अखेरपर्यंत ७५ टक्के नालेसफाई होणार, का असा प्रश्न केला जात आहे.

गाळाच्या वजनानुसार पैसे

पालिकेच्या अटीनुसार गाळ काढणे, साठवणे, वाहून नेणे व त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी कंत्राटदारावर राहणार आहे. कंत्राटदाराने काढलेल्या गाळाच्या वजनानुसारच कामाचे पैसे दिले जाणार आहेत. शिवाय कंत्राटदाराच्या कामावर नजर ठेवण्यात येईल.

निवडणूक कामामुळे कसरत

लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी पालिकेचे ५० टक्क्यांहून जास्त कर्मचारी नेमण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांना पालिकेचे नियमित काम करून निवडणुकीचे काम करावे लागणार आहे. त्यामुळे नालेसफाईसह सर्वच कामांवर देखरेख ठेवण्यासाठी पालिकेला कसरत करावी लागणार आहे. परिणामी, कामाच्या देखरेखीसाठी मनुष्यबळाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

मुंबईतील नाले

छोटे नाले १,५०८ (लांबी ६०५ किमी)
मोठे नाले ३०९ (लांबी २९० किमी)
मिठी नदी ११ किमी
रस्त्याकडेची गटारे १,३८०

३० एप्रिलला आढावा बैठक

३० एप्रिल अखेरपर्यंत ३५ टक्के गाळ उपसा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून याचा आढावा घेण्यासाठी ३० एप्रिल रोजी आढावा बैठक घेण्यात येणार आहे.
थकीत मिळकतकर वसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरापुढे बँडवादन, पालिकेकडे २,१६८ कोटींहून अधिक कर जमा
नालेसफाई
एकूण कंत्राटदार : ३१
द्वैवार्षिक कंत्राट : २४९ कोटी रु.
मोठे नाले : ९१. ६२ कोटी रु.
छोटे नाले : १०२.०३ कोटी रु.
महामार्ग : १४.२० कोटी रु.
मिठी नदी : ४१.४१ कोटी रु.
एकूण गाळ काढणार : १३ लाख १० हजार १५१ मेट्रिक टन
३१ मे २०२४ पूर्वी : १० लाख २२ हजार १२१ मेट्रिक टन
३१ सप्टेंबरपूर्वी : १ लाख ५७ हजार मेट्रिक टन
२५ मार्च २०२५ : १ लाख ३१ हजार

महत्वाचे लेख