अ‍ॅपशहर

उद्धव यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात शिवसेनेवर घणाघाती टीका केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया देताना भाजपवर मोजक्याच पण बोचऱ्या शब्दांत पलटवार केला आहे. 'मी जास्त बोलणार नाही, माझा घसा बसेल', असा चिमटाही त्यांनी मेळाव्यात पॉज घेऊन पाणी पिणाऱ्या मुख्यमंत्र्यांना काढला आहे.

Maharashtra Times 29 Jan 2017, 2:46 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bmc election 2017 uddhav thackeray slams cm devendra fadnavis
उद्धव यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात शिवसेनेवर घणाघाती टीका केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया देताना भाजपवर मोजक्याच पण बोचऱ्या शब्दांत पलटवार केला आहे. 'मी जास्त बोलणार नाही, माझा घसा बसेल', असा चिमटाही त्यांनी मेळाव्यात पॉज घेऊन पाणी पिणाऱ्या मुख्यमंत्र्यांना काढला आहे.

शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडण्याची गर्जना केल्यानंतर राज्याच्या आणि केंद्राच्या सत्तेत आजही मांडीला मांडी लावून बसलेले हे दोन्ही पक्ष आमनेसामने उभे ठाकले आहेत. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. उद्धव यांच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशीष शेलार यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर उद्धव यांनी आज लगेचच परतफेड केली आहे.

उद्धव यांनी मुख्यमंत्री तसेच शेलार या दोघांवरही टीकास्त्र सोडलं. मुख्यमंत्र्यांची एक प्रतिमा होती, पण आता ती मलिन झाली आहे. ते आता गुंडांचे मंत्री तर नाहीत ना, असा प्रश्न पडावा अशी स्थिती निर्माण झाली आहे, असा टोला उद्धव यांनी लगावला. आता अच्छे दिनबद्दल कुणी का बोलत नाही, असा सवालही त्यांनी केला.

शेलार यांचा समाचार

लाल किल्ल्यावर भाषण केल्याने कुणी पंतप्रधान होत नाही त्याप्रमाणेच स्वत:ला पांडव म्हटल्याने कुणी पांडव होत नाही, अशा शब्दांत यावेळी उद्धव यांनी शेलार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. कालचा प्रकार पाहून कोकणातल्या दशावताराची आठवण झाली, असा टोलाही उद्धव यांनी लगावला.

भाजपला काय टीका करायची ती करू द्या, त्याकडे जास्त लक्ष देऊ नका. आपण केलेली कामे लोकांपुढे घेऊन जा. आपल्याला आधुनिक मुंबई घडवायची आहे. मुंबई-ठाणेकरांना दिलेली वचनं पूर्ण करायची आहेत, असे आवाहनही त्यांनी शिवसैनिकांना केले.

गुरुदास कामत समर्थक आंबेरकर सेनेत

मुंबईत काँग्रेसमध्ये गुरुदास कामत विरुद्ध संजय निरुपम असा संघर्ष सुरू असून त्यातूनच आधी माजी आमदार कृष्णा हेगडे आणि आता देवेंद्र आंबेरकर या दोन कामत समर्थकांनी काँग्रेसला रामराम ठोकला. कृष्णा हेगडे यांनी भाजपचा मार्ग धरल्यानंतर आज देवेंद्र आंबेरकर यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेतला. उद्धव यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. आंबेरकर यांचं अंधेरी भागात वर्चस्व आहे. पालिकेत ते विरोधी पक्षनेतेही राहिलेले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज