अ‍ॅपशहर

मुख्यमंत्र्यांकडून आचारसंहितेचा भंग: शिवसेना

प्रचार संपल्यानंतरही आज सकाळपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी माध्यमांना मुलाखती देण्याचा धडाका लावला असून हा सरळसरळ निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे, अशी तक्रार शिवसेनेने राज्य निवडणूक आयोगाकडे केली असून आयोगाने याप्रकरणी कारवाई केली नाही तर न्यायालयाचं दार ठोठावण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.

Maharashtra Times 20 Feb 2017, 8:23 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bmc election2017 shiv sena files complaint against cm devendra fadnavis with election commission
मुख्यमंत्र्यांकडून आचारसंहितेचा भंग: शिवसेना


प्रचार संपल्यानंतरही आज सकाळपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी माध्यमांना मुलाखती देण्याचा धडाका लावला असून हा सरळसरळ निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे, अशी तक्रार शिवसेनेने राज्य निवडणूक आयोगाकडे केली असून आयोगाने याप्रकरणी कारवाई केली नाही तर न्यायालयाचं दार ठोठावण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या मुलाखती म्हणजे पेडन्यूजचा प्रकार असावा असा संशयही शिवसेनेने घेतला आहे.

शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी आज निवडणूक आयोगाकडे मुख्यमंत्र्याविरोधात तक्रार केली. त्यानंतर सायंकाळी शिवसेना भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतींवर तीव्र शब्दांत आक्षेप नोंदवला.

काल अधिकृतपणे प्रचार संपला असतानाही आज देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी मुलाखती देण्याचा धडाका लावला आहे. आपल्या छातीवर कमळाचं चिन्ह लावून ते प्रचार करत आहेत. हा मतदारांवर प्रभाव आणि दबाव टाकण्याचाच प्रयत्न आहे. मुख्यमंत्र्यांना सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून अशाप्रकारे मतदारांवर दबाव टाकण्याचा कोणताही अधिकार नाही, असे राऊत म्हणाले. मुलाखती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवडणूक आयोगाने विशेष परवानगी दिली असेल तर तशी परवानगी सगळ्यांना मिळायला हवी, असेही राऊत म्हणाले. पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्यांना राजकारणातली ही पारदर्शकता कळू नये का?, असा सवालही राऊत यांनी केला.

मुख्यमंत्र्यांना आव्हान

उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोणी रोखलेले नाही, असे राऊत यांनी यावेळी उद्धव यांच्यावर किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सुनावले. जवानांच्या वीरपत्नींबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या प्रशांत परिचारकांवर कारवाई करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यानी केली असती तर त्याचा आम्हाला अधिक आनंद वाटला असता, असा टोलाही राऊत यांनी लगावला. परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली. आमच्यावर कारवाई करण्याची भाषा करणाऱ्यांवरच काही दिवसांनी कारवाई होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

भाजपने आरोप फेटाळले

मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग केलेला नाही. मुख्यमंत्री २५ वर्षांपासून राजकारणात आहेत. त्यामुळे आपण काय करतो याची पूर्ण जाणीव त्यांना आहे. तरीही त्यांच्याबाबत तक्रार झाली असेल तर त्याची शहानिशा करायला संबंधित यंत्रणा सक्षम आहे, असे भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज