अ‍ॅपशहर

रस्त्यांचा कायापालट; पालिका राबवणार १२० किमी रस्त्यांची दुरुस्तीची मोहिम

मुंबईतील पालिकेच्या सर्वच २४ विभागांत रस्ते पुनर्पृष्ठीकरणाचे काम पावसाळ्यानंतर केले जाणार आहे. त्यात संपूर्ण मुंबईतील १२० किमीचे रस्ते अंतर्भूत आहेत. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या असून ती प्रक्रिया पूर्ण झाली की पावसाळ्यानंतर पृष्ठभाग भक्कम करण्याची कामे सुरू केली जातील

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 30 Sep 2022, 7:48 am
मुंबई : मुंबईतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुर्दशा झाल्याने मुंबईकरांना सर्वत्र प्रवासयातना सहन कराव्या लागत आहेत. मुंबईकरांचा मनस्ताप कमी करण्यासाठी पावसाळा संपताच मुंबई महापालिकेमार्फत रस्ते दुरुस्तीची मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्या अंतर्गत मुंबईतील सर्वच भागांतील सुमारे १२० किमीच्या रस्त्यांवरील थर काढून तिथे नवीन थरांचा भक्कम पृष्ठभाग तयार केला जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या रस्ते विभागामार्फत त्यासाठी २०० कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai road
रस्त्यांचा कायापालट; पालिका राबवणार १२० किमी रस्त्यांची दुरुस्तीची मोहिम


मुंबईतील रस्त्यांच्या वारंवार होणाऱ्या दुर्दशेची दखल मुंबई उच्च न्यायालयासह राज्य सरकारनेही घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पालिकेला सर्वात खराब २० रस्त्यांच्या दुरुस्तीचा आराखडा एका आठवड्यात तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, पालिकेमार्फत शुक्रवारी उच्च न्यायालयात आराखडा सादर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या रस्ते विभागाने पुढील वर्षीही रस्ते सुस्थितीत राहावेत यासाठी रस्त्यांच्या पुनर्पृष्ठीकरणाचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील पालिकेच्या सर्वच २४ विभागांत रस्ते पुनर्पृष्ठीकरणाचे काम पावसाळ्यानंतर केले जाणार आहे. त्यात संपूर्ण मुंबईतील १२० किमीचे रस्ते अंतर्भूत आहेत. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या असून ती प्रक्रिया पूर्ण झाली की पावसाळ्यानंतर पृष्ठभाग भक्कम करण्याची कामे सुरू केली जातील. या संपूर्ण कामासाठी सुमारे २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. रस्ते दुरुस्तीची कामे विभागवार केली जाणार असल्याचे पालिकेच्या पायाभूत सुविधा विभागाचे उपायुक्त आणि रस्ते विभागाचे मुख्य अभियंता (विशेष) उल्हास महाले यांनी सांगितले.

मुंबईच्या सौंदर्यीकरणासाठी पालिकेने १,७०० कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यातील ५०० कोटी रुपये रस्ते दुरुस्तीसाठी आहेत. त्यापैकी २०० कोटींच्या निधीतून रस्तेदुरुस्ती केली जाणार आहे.

नेमके काय करणार?

संपूर्ण मुंबईत १२० किमी रस्त्यांवरील सध्याचा थर काढून टाकला जाणार आहे. त्याठिकाणी नव्याने थरांचा भक्कम लेप दिला जाणार आहे. साधारण ४० मिमीचा हा थर असून त्यामुळे रस्ते खड्डेमुक्त होतील, असा दावा केला जात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज