अ‍ॅपशहर

महालक्ष्मी केंद्रासाठी ४५ कोटींचा चुराडा

महालक्ष्मी रेसकोर्सवर गेल्या वर्षी बांधलेले ७०० खाटांचे जम्बो कोविड केंद्र वापराविनाच गुंडाळण्यात आले असून आता या ठिकाणी नवीन केंद्र उभारण्याचा घाट घालण्यात आला आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स 29 Apr 2021, 6:47 am
म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम महालक्ष्मी केंद्रासाठी ४५ कोटींचा चुराडा


महालक्ष्मी रेसकोर्सवर गेल्या वर्षी बांधलेले ७०० खाटांचे जम्बो कोविड केंद्र वापराविनाच गुंडाळण्यात आले असून आता या ठिकाणी नवीन केंद्र उभारण्याचा घाट घालण्यात आला आहे. गेल्या वर्षी बांधलेले केंद्र कॉर्पोरेट सेक्टर निधीतून बांधण्यात आले होते. नवीन केंद्रासाठी पालिकेला तब्बल ४० ते ४५ कोटी रुपये खर्च येणार आहे. मागील वर्षीचे केंद्र बंद केले नसते तर आता नवीन केंद्र उभारण्याची वेळ आली नसती तसेच कोट्यवधी रुपयांचा खर्च देखील वाचला असता.

करोनाच्या पहिल्या लाटेत गेल्या वर्षी महालक्ष्मी रेसकोर्सवरील पार्किंग लॉटजवळ ७०० खाटांचे करोना केंद्र बांधण्यात आले होते. कॉर्पोरेट सेक्टर निधीतून नमन ग्रुप या बिल्डरने ते बांधून दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या केंद्राचे ऑनलाइन उद्घाटन केले होते. मागील वर्षी मे आणि जूनमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ झाल्याने या केंद्राचा वापर करण्याचे निश्चित झाले होते. दरम्यान पावसाळ्यात या केंद्रात पाणी शिरल्याने हे केंद्र सुरू करण्यात आले नाही. पावसानंतर मुंबईतील रुग्णसंख्या कमी होत गेल्याने या केंद्राची गरज भासली नाही. त्यामुळे कोणत्याही वापराविनाच हे केंद्र यंदाच्या जानेवारीत गुंडाळण्यात आले.

दरम्यान, पालिकेची गोरेगाव नेस्को, बीकेसी, दहिसर, मुलुंड, वरळी येथे जम्बो करोना केंद्रे असून तेथे हजारो रुग्णांच्या उपचारांची सोय करण्यात आली आहे. मात्र वाढत्या रुग्णसंख्येमुळे यंत्रणेवरचा ताण वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर ही नवीन करोना केंद्रे उभारण्याचे ठरवले आहे. पार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव पट्ट्यातील रुग्णांसाठी पालिकेचे सेव्हन हिल रुग्णालय उपयुक्त ठरले आहे, तर मालाड ते दादरपर्यंतच्या रुग्णांसाठी दहिसर कोविड केंद्र आहे. मात्र ही दोन्ही केंद्रे खच्चून भरली आहेत. दहिसर केंद्रावर वसई, विरारपासूनचे रुग्ण येत असल्याने ताण वाढला आहे. या स्थितीत जोगेश्वरी आणि मालाडला केंद्र उभारून हा ताण कमी केला जाणार आहे, तर महालक्ष्मी रेसकोर्स केंद्र उभारून वरळी व दक्षिण मुंबईतील केईएम, नायर रुग्णालयांना दिलासा दिला जाणार आहे. या केंद्रात अत्याधुनिक सेवांसह रुग्णांचे समुपदेशन करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सुमारे ४५० खाटांची व्यवस्था

वाढती रुग्णसंख्या आणि करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने आरोग्य यंत्रणा आणखी बळकट करण्यासाठी पावले उचलली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून महालक्ष्मी रेसकोर्स, जोगेश्वरी आणि मालाड परिसरात जम्बो करोना केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यापैकी रेसकोर्स केंद्रासाठी बुधवारी निविदा मागवण्यात आल्या आहेत. या केंद्रात ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह सुमारे ४५० खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. सुमारे ४० ते ४५ कोटी रुपये खर्च या केंद्रासाठी अपेक्षित आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज