अ‍ॅपशहर

‘दीदी म्हणजे अभिव्यक्तीत विसर्जित झालेले व्यक्तिमत्त्व’

'व्यक्तीमत्त्व अभिव्यक्तीत विसर्जित झाले की कला साकारते. दीदीच्या बाबतीत हेच झाले. दीदीमध्ये बाबांचे सगळे गुण आहेत. त्यांचा आवाज, नजर, सहज स्वर... बाबांचे गाणे दीदीकडे आले; तसे इतर भावंडांकडे आले नाही,' अशा शब्दांत लतादीदींचे व्यक्तिमत्त्व रसिकांसमोर उलगडत पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांना ९०व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

Maharashtra Times 29 Sep 2019, 3:12 am
पं. हृदयनाथांनी व्यक्त केल्या हृद्य भावना
महाराष्ट्र टाइम्स.कॉम lata-mangeshkar-birthday


लता मंगेशकरांच्या ९०व्या वाढदिवसाचे निमित्त

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

'व्यक्तीमत्त्व अभिव्यक्तीत विसर्जित झाले की कला साकारते. दीदीच्या बाबतीत हेच झाले. दीदीमध्ये बाबांचे सगळे गुण आहेत. त्यांचा आवाज, नजर, सहज स्वर... बाबांचे गाणे दीदीकडे आले; तसे इतर भावंडांकडे आले नाही,' अशा शब्दांत लतादीदींचे व्यक्तिमत्त्व रसिकांसमोर उलगडत पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांना ९०व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. रवींद्र नाट्य मंदिर येथे जीवनगाणी आयोजित 'लता ९०' या कार्यक्रमात 'दीदी आणि मी' या विशेष सत्रात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

दीदी शिवभक्त आहेत. सुमारे १९७०पर्यंतच्या पत्रांवर ती शिवदासी अशी स्वाक्षरी करत असे. मंगेशीला तर ती मानतेच मात्र छत्रपती शिवाजी महाराजही तिचे दैवत आहेत. शिवरायांची गाणी म्हणताना तिच्या आवाजाला एक वेगळीच धार येते, असाही लता मंगेशकर यांचा पैलू पं. हृदयनाथ यांनी प्रेक्षकांना सांगितला. दीदी रसिकांसाठी काय आहे, ते त्यांचे त्यांना माहीत. मात्र माझ्यासाठी दीदी खूप महत्त्वाची आहे. ती नसते तेव्हा 'मूर्तीवाचून विश्व वाटे अंधारले' अशी जाणीव होते, अशीही भावना त्यांनी या गप्पांमध्ये व्यक्त केली. यावेळी राधा मंगेशकर आणि विभावरी आपटे यांनी लता मंगेशकर यांची काही गाजलेली गाणी सादर केली.

'लता ९०' या कार्यक्रमात लता मंगेशकर यांच्या आठवणी सांगणाऱ्या 'लता' या ग्रंथाचे जीवनगाणीच्या माध्यमातून पुनःप्रकाशन करण्यात आले. पं. हृदयनाथ यांनी हा ग्रंथ लता मंगेशकरांच्या कारकिर्दीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त प्रकाशित केला होता. त्यानंतर शनिवारी या ग्रंथाच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फडणवीस यांनी लता मंगेशकरांची गाणी ऐकायला मिळणे, हे भाग्य असल्याची भावना व्यक्त केली.

या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनासुद्धा उपस्थित होत्या. त्यांनी सगळे जगच त्यांच्याबद्दल गौरवास्पद बोलत आहे, हाच आनंद असल्याचे सांगत, हे नाव हजारो वर्षे विश्वात गाजत राहू दे, अशा शब्दांमध्ये दीदींना शुभेच्छा दिल्या. लता मंगेशकर यांच्या ९०व्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ज्येष्ठ संगीतकार आनंदजी, दिग्दर्शक जब्बार पटेल, अभिनेते जॅकी श्रॉफ, गायक सुरेश वाडकर, गायिका उत्तरा केळकर, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री अॅड. आशिष शेलार आदी उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज