अ‍ॅपशहर

अनुदानित शाळातील मुख्याध्यापकांना पुस्तक संरक्षणाचे काम

सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक व स्वाध्याय पुस्तकांचे मोफत वाटप केले जाते...

Maharashtra Times 3 Jul 2018, 4:54 am
niraj.pandit@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bookkeeping work for headmasters
अनुदानित शाळातील मुख्याध्यापकांना पुस्तक संरक्षणाचे काम


nirajcpanditMT

मुंबई : सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक व स्वाध्याय पुस्तकांचे मोफत वाटप केले जाते. वर्ष संपल्यावर ही पुस्तके परत घेऊन पुढील वर्षी त्या इयत्तेमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना द्यावी व तोपर्यंत पुस्तकांना वाळवी लागणार नाही, आग लागणार नाही, त्याची चोरी होणार नाही, फाटणार नाहीत याची काळजी घेण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपवण्यात आली आहे. यासंदर्भात शिक्षण निरीक्षकांनी काढलेल्या परिपत्रकामुळे शहरातील शाळांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.

इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी नवीन पुस्तके देण्यात यावी यासाठी अनुदानित शाळांमध्ये त्याची यादी करून ती सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत नेमून दिलेल्या केंद्रावर दिली जाते. ही पुस्तके पुन्हा शाळेत जमा करण्याचा कोणताही नियम राज्य शासनाने काढलेल्या १६ मे, २०१८च्या परिपत्रकात नमूद केलेला नाही. यामुळे शिक्षण निरीक्षकांनी कोणत्या आधारे हे परिपत्रक काढले, तसेच हे आणखी एक अशैक्षणिक काम शिक्षकांवर का लादण्यात आले, असे सवाल विचारले जात आहेत. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके देताना शाळांनी त्याची एका रजिस्टरमध्ये नोंद करायची आहे. शैक्षणिक वर्ष संपल्यावर ती पुस्तके शाळेत जमा करताना पुन्हा नोंद करून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होईपर्यंत त्यांची काळजी घेणे ही मुख्याध्यापकांची जबाबदारी असेल. पुस्तके फाटली किंवा त्यांचे बाइंडिंग निघाले तर ती दुरुस्त करण्याचे कामही शिक्षकांना करावे लागणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर नवीन विद्यार्थ्यांना या जुन्या पुस्तकांचे वाटप होईल. सर्व विद्यार्थ्यांना वाटप केल्यानंतरही पुस्तके उरली तर शेजारील विनाअनुदानित शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना त्याचे वाटप करावे, असेही परिपत्रकात म्हटले आहे. तिसऱ्या वर्षी रितसर निविदा मागवून पुस्तके रद्दीत विक्री करावी, असेही त्यात म्हटले आहे. हे सर्व करणे म्हणजे वेळखाऊ काम असून, यातून नेमके काय साध्य होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वापरलेली पुस्तके विद्यार्थ्यांना देणे म्हणजे पुस्तक वाचण्यातील उत्साह कमी करण्यासारखे आहे. एका विद्यार्थ्याकडे चांगले तर दुसऱ्याकडे फाटके पुस्तक आले, तर त्यांच्या मनात वेगळे विचार येऊ शकतात. शिक्षकांसाठीही आणखी एका अशैक्षणिक कामाची भर पडली आहे. - प्रशांत रेडीज, अध्यक्ष, मुंबई मुख्याध्यापक संघ

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज