अ‍ॅपशहर

ओसी मिळाल्यानंतर इमारत ठरली बेकायदा!

बेकायदा बांधकामे व त्यांच्या तिढ्याची विविध प्रकरणे चर्चेत असतानाच नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये तर रीतसर परवानगीने उभ्या राहिलेल्या आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर महापालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्रही (ओसी) मिळालेल्या इमारतीला महापालिकेनेच बेकायदा ठरवल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ही इमारत तोडण्याचा आदेश पालिकेने काढल्याने पायाखालची वाळूच सरकलेल्या रहिवाशांनी तातडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाने गुरुवारी त्यांना अंतरिम दिलासा दिला आहे.

Maharashtra Times 10 Mar 2017, 2:42 am
ramesh.khokrale@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम building illegal though has oc
ओसी मिळाल्यानंतर इमारत ठरली बेकायदा!


Tweet : @rameshkMT

बेकायदा बांधकामे व त्यांच्या तिढ्याची विविध प्रकरणे चर्चेत असतानाच नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये तर रीतसर परवानगीने उभ्या राहिलेल्या आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर महापालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्रही (ओसी) मिळालेल्या इमारतीला महापालिकेनेच बेकायदा ठरवल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ही इमारत तोडण्याचा आदेश पालिकेने काढल्याने पायाखालची वाळूच सरकलेल्या रहिवाशांनी तातडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाने गुरुवारी त्यांना अंतरिम दिलासा दिला आहे.

दोन आठवड्यांसाठी इमारत तोडण्याची कारवाई करू नये, असे आदेश महापालिकेला देतानाच या सबंध गैरव्यवहाराचा गुन्हे शाखेच्या सहायक पोलिस आयुक्तांनी तपास करावा आणि त्यारव उपायुक्तांनी देखरेख करावी, असा आदेशही न्या. नरेश पाटील व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने दिला.


काय आहे प्रकरण?

सोसायटीच्या याचिकेनुसार, ऐरोलीमधील भूखंड क्रमांक 53/5 वर कृष्णा स्वेअर ही चार मजली व 23 सदनिका असलेली इमारत कृष्णा डेव्हलपर्सने सुमारे तीन वर्षांपूर्वी बांधली आहे. हा साडेबारा टक्के योजनेमधील भूखंड आहे. त्याविषयी वाळक्या झिपऱ्या पाटील या मूळ मालकाशी बिल्डरने करारनामा करून गृहनिर्माण प्रकल्पाचा प्रस्ताव दिला. महापालिकेच्या सर्व परवानगी रीतसर मिळवून इमारत उभारली आणि पालिकेनेही 7 जुलै 2014 रोजी ओसी दिली. खरेदीदारांनी सर्व काही नियमित आहे याची खातरजमा करूनच बँकांमधून गृहकर्जे घेऊन सदनिका खरेदी केल्या आणि त्यात रहायला गेले. 2013मध्ये सिडकोने बिल्डरला नोटीस दिली होती. पण बिल्डरने सर्व परवानग्या असल्याचे दाखवल्याने पालिकेनी ओसी दिली होती. मात्र, नंतर आमचा हा भूखंड आम्ही कोणाला दिलेलाच नाही, तुम्ही बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकाम केले आहे, अशी नोटीस सिडकोने बिल्डरला दिली. तसेच महापालिकेला बांधकाम परवानगी मागे घेण्याची विनंती केली. सोसायटीने वाशी न्यायालयात धाव घेऊन दावा दाखल केला. त्याप्रमाणे वाशी न्यायालयाने कारवाईची कोणतीही पावले उचलू नये, असा अंतरिम मनाई आदेश दिला. मात्र, तरीही पालिकेने सिडकोच्या विनंतीवरून एमआरटीपी कायद्याच्या कलम 51खाली इमारत तोडण्याचे आदेश बिल्डरला दिले. याविषयी आम्हाला साधी नोटीसही देण्यात आली नाही, असे गारहाणे कारवाईच्या भीतीने धाबे दणाणलेल्या रहिवाशांनी मांडले.


सिडकोच्या नोंदणी प्रक्रियेबद्दल आश्चर्य

मालमत्तेची अधिकृत नोंदणी करण्यासाठी नियमाप्रमाणे उपनिबंधकांच्या कार्यालयात जाताना सिडकोचा अधिकारीच सोबत जात नाही, अशी धक्कादायक बाबही सुनावणीत उघडकीस आल्यानंतर खंडपीठ अवाक् झाले. अधिकारी कार्यालयातच कागदपत्रांवर सही करतात, असे सिडकोच्या वकिलांनीही मान्य केले. तेव्हा ‘तुम्ही मालमत्तेचे मालक आहात आणि तुमचा माणूसच परवानाधारकासोबत नोंदणीसाठी जात नसेल तर कसे होणार? मग असे घोटाळे का होणार नाहीत? इतक्या मौल्यवान भूखंडांचे व्यवहार अशा भोंगळ पद्धतीने होणार असतील तर मग तुम्ही खासगी व्यक्तींच्या जमिनींचे भूसंपादन करताच कशाला?’, असा खडा सवालही खंडपीठाने उपस्थित केला. त्याचवेळी सगळा कारभार कसा सुरू आहे पहा, या साऱ्या गंभीर प्रकरणात व्यापक चौकशी व्हायला नको का? सरकारने यात गांभीर्याने लक्ष घालावे, असे मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांना सांगितले.


नवी मुंबई महापा‌लिकेची भूमिका

बिल्डरने बनावट कागदपत्रांच्या आधारे परवानगी मिळवली असल्याने आम्हाला महापालिका कायद्यान्वये इमारत तोडण्याचा अधिकार आहे. हे बांधकाम नियमितही होऊ शकत नाही, अशी भूमिका महापालिकेतर्फे अॅड. संदीप मारणे यांनी मांडली.

सिडकोची भूमिका

आम्ही या भूखंडाचे वाटप कोणाला केलेलेच नाही. सिडकोच्या अधिकाऱ्याने बिल्डरशी संगनमत केले असेल तर त्याच्यावरही कारवाई होईल, पण ही इमारत बेकायदाच आहे, असे म्हणणे सिडकोतर्फे अॅड. जी. एस. हेगडे यांनी मांडले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज