अ‍ॅपशहर

मुंबईमध्ये डोळ्यांची साथ

पावसाची अधूनमधून लागणारी हजेरी, तापमानातील वाढता उष्मा आणि आद्रतेमुळे येणारा घाम, अशा विचित्र वातावरणामुळे मुंबईमध्ये डोळ्यांची साथ आली आहे. डोळ्यांतून पाणी येणे, डोळे लाल होणे, चुरचुरणे, डोळ्यात खुपणे अशा प्रकारच्या तक्रारीही मुंबईकरांमध्ये वाढल्या आहेत.

महाराष्ट्र टाइम्स 22 Aug 2019, 4:00 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः पावसाची अधूनमधून लागणारी हजेरी, तापमानातील वाढता उष्मा आणि आद्रतेमुळे येणारा घाम, अशा विचित्र वातावरणामुळे मुंबईमध्ये डोळ्यांची साथ आली आहे. डोळ्यांतून पाणी येणे, डोळे लाल होणे, चुरचुरणे, डोळ्यात खुपणे अशा प्रकारच्या तक्रारीही मुंबईकरांमध्ये वाढल्या आहेत. परिणामी, खासगी व सार्वजनिक रुग्णालयांमध्ये डोळे आल्याच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम eye


अशा प्रकारच्या वातावरणामध्ये डोळ्यांना होणारा संसर्ग वेगाने वाढतो, हा संसर्ग पसरवणारे विषाणूंचा संसर्ग इतरांना होऊ नये यासाठी डोळे आलेल्या व्यक्तीचा साबण, वापरायचे कपडे वेगळे ठेवायला हवेत. हा संसर्ग इतरांना होऊन त्यांनाही त्याचा त्रास होऊ शकतो, असा सल्ला नेत्रविकारतज्ज्ञ डॉ. जगदीश स. पाटील यांनी दिला आहे. मलेरिया, डेंग्यू, स्वाइन फ्लूसारख्या तापामध्ये डोळे लाल होऊन त्यातून पाणी येते, डोळे चुरचुरतात त्यामुळे या लक्षणांकडे लक्ष द्यायला हवे, असेही ते म्हणाले.

दरवर्षी ऑक्टोबर महिना सुरू झाला की हमखास डोळ्यांची साथ येते. यावर्षी या साथीचा जोर अधिक असल्याचे दिसून येते. पश्चिम उपनगरासह पूर्व उपनगरामध्ये शीव, कुर्ला, घाटकोपर, भायखाळा या भागांमध्ये डोळे येण्याच्या तक्रारी वाढत्या आहेत. या साथीच्या लक्षणांमध्येही बदल झाला आहे. डोळे लाल होणे, पाणी येणे, डोळे चुरचुरण्यासह ताप येणे, सर्दी खोकला असाही त्रास वाढता असल्याचे दिसून येते, असे डॉ. निनाद पवार सांगतात. डोळे आल्यानंतर पाच दिवसांनी संसर्ग कमी होईल, असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र अशा समजुतीमध्ये राहून स्वतःच कोणतीही औषधे, ड्रॉप्स डोळ्यात टाकू नयेत असाही सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

ही काळजी घ्या

- डोळे आल्यास तुमच्या वापरातील वस्तू इतरांना देऊ नका.

- औषध दुकानातून औषधे आणून डोळ्यांत टाकू नका.

- नेत्रविकार तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

- डोळ्यातील लालसरपणा, खाज तसेच पाणी येण्याची तीव्रता अधिक असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज