अ‍ॅपशहर

'मी आधीच ठरवलं होतं की....'; शिवाजी पार्कच्या मैदानाबाबत एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

Eknath Shinde Dasara Melava : बीकेसी मैदानात घेतलेल्या दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. तसंच पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे.

Authored byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Oct 2022, 9:14 pm
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत घेतलेल्या दसरा मेळाव्यातून हिंदुत्वासह अनेक मुद्द्यांवर परखड भूमिका मांडली. तसंच शिवाजी पार्कच्या मैदानावरून झालेल्या वादंगाबाबत भाष्य करत एक नवा गौप्यस्फोट केला. 'तुम्ही न्यायालयात जाऊन शिवाजी पार्क मिळवलं, मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे, मी आधीच ठरवलं होतं की शिवाजी पार्कचं मैदान त्यांना सभेसाठी देण्यामध्ये अजिबात हस्तक्षेप करायचा नाही. सदा सरवणकर यांनी पहिला अर्ज दिलेला, मैदान आम्हालाही मिळालं असतं, पण मी या राज्याचा मुख्यमंत्री असल्याने कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे मैदान जरी त्यांना मिळालं असलं तरी शिवसेनाप्रमुखांचे विचार मात्र आमच्यासोबत आहेत,' असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम eknath shinde speech news
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


बीकेसी मैदानात घेतलेल्या दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. 'शिवसेनाप्रमुखांची परंपरा तुम्ही मोडून काढली, त्यांच्या विचारांना मूठमाती तुम्ही दिली. मग त्या शिवाजी पार्कवर उभं राहण्याचा तरी नैतिक अधिकार तुम्हाला आहे का?' असा सवालही शिंदे यांनी विचारला आहे. तसंच हजारो शिवसैनिकांनी आपला घाम आणि रक्त सांडून जो पक्ष उभा केला तो तुम्ही वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी गहाण ठेवला. बाळासाहेब रिमोट कंट्रोलने सरकार चालवायचे, पण तुम्ही तर सरकारचा आणि शिवसेनेचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीकडे देऊन टाकला, असा हल्लाबोलही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

Uddhav Thackeray: अमित शाह प्रत्येक राज्यात जातात, काड्या घालतात, सरकारं पाडतात: उद्धव ठाकरे

'आम्ही घेतलेल्या हिंदुत्वाच्या भूमिकेला पाठिंबा मिळतोय, मला तर या सभेतील शेवटचा माणूसही दिसत नाही. खरी शिवसेना कुठे आहे, याचं उत्तर या महासागराने सगळ्या हिंदुस्थानाला दिलं आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कुठे आहेत, हे सगळ्यांना आता कळालं असेल,' अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे.
लेखकाबद्दल
अक्षय शितोळे
अक्षय शितोळे, २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय.... आणखी वाचा

महत्वाचे लेख