अ‍ॅपशहर

मिलिंद नार्वेकर तुमच्या साथीला येतायेत? एकनाथ शिंदे म्हणतात, लपवायचं काय, आपलं रोखठोक असतंय!

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील उभी फूट पडल्यानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे गेल्या काही दिवसांपासून फारसे सक्रिय नसल्याचं सांगितलं जातंय. गेल्या दोन महिन्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस, श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी घेतल्या आहेत. गणेशोत्सव काळात तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नार्वेकरांच्या घरी जाऊन त्यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. मिलिंद नार्वेकर यांच्या हालचाली गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंना धडकी भरवणाऱ्याच मानल्या जात आहेत.

Authored byअक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Oct 2022, 3:33 pm

हायलाइट्स:

  • उद्धव ठाकरेंची 'सावली' शिदे गटात प्रवेश करणार?
  • गुलाबरावांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात बॉम्ब फोडला
  • मिलिंद नार्वेकरांवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात...
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Eknath Shinde And Milind Narvekar
एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर
मुंबई : गेली २८ वर्ष उद्धव ठाकरे यांची 'सावली' बनून वावरलेले नेते मिलिंद नार्वेकर 'वेगळ्या' विचाराच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. मिलिंद नार्वेकर लवकरच एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलून दाखवलीये. बाळासाहेबांचे सहकारी चंपासिंग थापा यांनी आम्हाला साथ द्यायचा निर्णय घेतलाय, आता 'त्यांचे' (उद्धव ठाकरे) सहकारीही आपल्याकडे येणार आहेत, अशी वार्ता सांगून गुलाबराव पाटलांनी राजकीय वर्तुळात बॉम्ब फोडला आहे. या सगळ्या घडामोडींनंतर उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही बरंच काही सांगून जाणारी प्रतिक्रिया माध्यमांना दिलीये.
मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाण्याच्या चर्चा का सुरु झाल्या?

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे गेल्या काही दिवसांपासून फारसे सक्रिय नसल्याचं सांगितलं जातं. गेल्या दोन महिन्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस, श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी घेतल्या आहेत. गणेशोत्सव काळात तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नार्वेकरांच्या घरी जाऊन त्यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. मिलिंद नार्वेकर यांच्या हालचाली गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंना धडकी भरवणाऱ्याच मानल्या जात आहेत. दुसरीकडे मिलिंद नार्वेकर यांची 'मातोश्री'तील जागा रवी म्हात्रे यांनी घेतली असल्याचीही चर्चा आहे. एकंदरित मिलिंद नार्वेकर यांच्या हालचाली आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचं मैत्रीचं नातं लक्षात घेता त्यांच्या शिंदे गटात प्रवेश करण्यासंबंधी अटकळ बांधली जात आहे.

नार्वेकरांच्या प्रवेशावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...

"माझं वागणं पोटात एक आणि ओठात एक असं नसतं. जे असतं ते खुल्या दिल्याने मी आपल्याला सांगतो. लपवून ठेवण्याचा माझा स्वभाव नाही, हे आपण मीडियातील सर्वजण जाणता. पण मिलिंद नार्वेकर यांच्या पक्षप्रवेशाबाबत माझ्याकडे कोणतीही माहिती नाही", असं हसत हसत एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. "मुख्यमंत्री म्हणून मला अनेक लोक भेटायला येत असतात. त्यांच्या कामानिमित्त ते माझी भेट घेत असतात. पण त्यांच्या प्रवेशाबाबत खरंच माझ्याकडे सध्या तरी माहिती नाही", असं एकनाथ शिंदे म्हणाले.

चंपासिंग थापा आला आता नंबर मिलिंद नार्वेकरांचा, गुलाबरावांनी बॉम्ब फोडला

बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक चंपासिंग थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात येत आहेत, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं. आम्ही 50 खोके घेतले असतील, पण ज्या चंपासिंह थापाने बाळासाहेबांची आयुष्यभर सेवा केली. त्यांना अग्नीडाग दिला, तो थापा आमच्याकडे आला, आता मिलिंद नार्वेकर देखील आमच्याकडे येत आहेत, असा बॉम्ब गुलाबरावांनी फोडला.
लेखकाबद्दल
अक्षय आढाव
अक्षय आढाव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | याआधी टीव्ही ९ मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ५ वर्षांचा अनुभव | राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची विशेष आवड.... आणखी वाचा

महत्वाचे लेख