अ‍ॅपशहर

विद्यार्थी निवडीअभावी लाखोंचा निधी वाया

मुंबई विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराचा फटका आता स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील बसला आहे.

Maharashtra Times 29 Mar 2017, 4:08 am
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्राला फटका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम competitive examination students suffers because of mumbai universitys chaos management
विद्यार्थी निवडीअभावी लाखोंचा निधी वाया

म. टा. प्रतिनिधी, मुंबई
मुंबई विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराचा फटका आता स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील बसला आहे. स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठाने सुरू केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्रात यंदाच्या वर्षी विद्यार्थीच न निवडल्याने लाखोंचा निधी वाया गेल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी या मार्गदर्शनापासून ही वंचित राहिले आहेत.

मुंबई विद्यापीठातर्फे मागासवर्गीय विद्यार्थी आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेता यावा आणि त्यांच्या कामगिरीचा आलेख उंचावावा, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्राची स्थापना करण्यात आली होती. ‘बार्टी’तर्फे काही वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या केंद्राच्या धर्तीवर हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. मागासवर्गीय विद्यार्थी आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र सुरू करण्यात आले असून यात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करणे, परीक्षेसाठी पुस्तके उपलब्ध करून देणे यासह अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यासाठी विद्यापीठाने अर्थसंकल्पात ५ लाखांचा निधींची तरतूददेखील केली आहे. मात्र यंदाच्या वर्षी या केंद्राकडून कोणत्याही विद्यार्थ्यांची निवडच करण्यात आलेली नसल्याने हा सर्व निधी वाया गेलेला आहे.

मुंबई विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. विद्यापीठाच्या अनागोंदी कारभारामुळे हा प्रकार घडला असून याचा फटका विद्यापीठातील असंख्य विद्यार्थ्यांना बसला आहे. याप्रकरणी कुलगुरूंनी लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

अद्ययावतीकरण सुरू
या केंद्रात योग्य त्या सोयी सुविधा, पुस्तके आवश्यक ती इतर साधने पुरविण्यात येणार आहेत. लवकरच त्याची कार्यवाही पूर्ण केली जाणार असून त्यानंतर विद्यार्थ्यांना या केंद्राचा लाभ घेता येणार असल्याचे केंद्राचे संचालक डॉ. मृदुल निळे यांनी ‘मटा’शी बोलताना स्पष्ट केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज