अ‍ॅपशहर

मुंबईत महिलांसाठी लोकल का सुरू होत नाही; काँग्रेसनं सांगितलं कारण

मुंबईत महिलांसाठी लोकल गाड्या सुरू न करण्यामागे कोणाचं राजकारण आहे, असा प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केला आहे. रेल्वे मंत्र्यांनी तातडीनं महिलांना ही सुविधा द्यावी, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Oct 2020, 4:21 pm
मुंबई: राज्य सरकारनं मुंबईत महिलांसाठी विशेष लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला असतानाही रेल्वेचे अधिकारी त्याची अंमलबजावणी करत नाहीत. यामागे भाजपचे राजकारण आहे? रेल्वे अधिकाऱ्यांवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा दबाव आहे,' असा थेट आरोप काँग्रेसनं केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Mumbai Local Train


नवरात्रीच्या मुहूर्तावर मुंबईत महिलांसाठी विशेष लोकल सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. त्यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत राज्य सरकार, महापालिका, पोलीस प्रशासन व मुख्य सचिवांनी मिळून चार वेगवेगळ्या बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये सर्व मुद्द्यांवर चर्चा होऊन रेल्वे सुरू करण्याचे ठरले. राज्य सरकारने १६ ऑक्टोबरला तसे पत्रही रेल्वे प्रशासनाला लिहिले. मात्र, त्यानंतर अचानक रेल्वे प्रशासनानं घूमजाव करत गाड्या सुरू करता येणार नसल्याचे सांगितले. रेल्वेच्या अधिकाऱ्यांवर अचानक दबाव कोणी आणला,' असा प्रश्न महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

वाचा: दु:ख वाटून घेण्याची आपली संस्कृती आहे; रोहित पवारांचा मोदींना टोला

'लोकल सुरू करण्यास असमर्थता व्यक्त करताना रेल्वेनं दिलेली कारणं न पटणारी आहेत. रेल्वे बोर्डाची परवानगी लागेल, असं रेल्वे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मग ही गोष्ट अधिकाऱ्यांना आधी माहीत नव्हती का? कोविडच्या नव्यानं जारी करण्यात आलेल्या निर्देशांचं पालन व्हायला हवं अशी अटही घालण्यात आली आहे. मात्र, आजही कोविडच्या सर्व निर्देशांचं पालन राज्य सरकारकडून केलं जात आहे. किती पॅसेंजर प्रवास करतील हे राज्य सरकारनं कळवावं, असंही रेल्वेनं म्हटलं आहे. खरंतर हा सर्व डेटा रेल्वेकडे आहे. मुंबईत कुठल्या तासाला किती महिला रेल्वेने प्रवास करतात हे सगळं रेल्वे प्रशासनाला माहीत आहे. असं असताना जो कांगावा केला जातोय त्यामागे भाजपचं राजकारण आहे, असं सावंत यांनी म्हटलं आहे. 'मुंबईचे असलेले रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी याचं उत्तर द्यायला हवं. मुंबईतील महिलांना रेल्वे प्रवासाची सुविधा मिळावी अशी त्यांची इच्छा नाही का? त्यांनी नवरात्रीचीही तमा बाळगलेली नाही. त्यांनी यात राजकारण करू नये,' असंही सावंत यांनी सुनावलं आहे.

वाचा: ...तर जग तुमची दखल घेतं; अॅमेझॉनच्या मालकाचं मनसेला पत्र

दरम्यान, मुंबईत महिलांसाठी लोकल सुरू करावी, अशी मागणी करणारं पत्र राज्य सरकारनं पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनाला लिहिलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज