अ‍ॅपशहर

महापालिकेसाठीही आघाडीचा प्रस्ताव, वेणुगोपाल यांच्या 'मातोश्री' भेटीत नव्या समीकरणांवर चर्चा

Uddhav Thackeray Shiv sena : महाविकास आघाडीतील घटक पक्षांची वज्रमूठ अधिक घट्ट होताना दिसते आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना अधिक जवळ येत आहे. काँग्रेस नेते वेणुगोपाल यांच्या भेटीने आता नव्या राजकीय समीरकरणांची नांदी होताना दिसतेय.

Authored byसौरभ शर्मा | महाराष्ट्र टाइम्स 19 Apr 2023, 6:09 am
मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण सध्या तापलेले असतानाच महाविकास आघाडीमध्येही नवी समीकरणे जुळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढण्यासंदर्भात काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये चर्चा झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kc venugopal meets uddhav thackeray
मुंबई महापालिकेसाठीही आघाडीचा प्रस्ताव, वेणुगोपाल यांच्या 'मातोश्री' भेटीत नव्या समीकरणांवर चर्चा


काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल आणि उद्धव ठाकरे यांच्यात सोमवारी मातोश्री निवासस्थानी झालेल्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाली. याविषयी स्थानिक नेत्यांसह चर्चा झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. दरम्यान, वेगुगोपाल आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहितीही सूत्रांकडून देण्यात आली.

मी जिवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार; अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत विषयच संपवला
वेणुगोपाल यांनी सोमवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. या भेटीत राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीसह इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे. भाजपला शह देण्यासाठी विरोधकांनी एकत्र येण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा केल्याची माहिती दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली. उद्धव ठाकरे यांनी लवकरच दिल्ली भेटीवर यावे, असे आमंत्रण वेणुगोपाल यांनी दिले. उद्धव यांचा दिल्ली दौरा या महिन्याच्या अखेरीस किंवा मेच्या सुरुवातीला होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

शिंदे गटाला अजितदादांची धास्ती? भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती केली तर...; संजय शिरसाटांचा इशारा
बंद दाराआड जवळपास अर्धा तास झालेल्या या चर्चेत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचाही विषय होता. स्थानिक स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुका एकत्रित लढण्यावरही या वेळी विचारविमिमय झाल्याचे सूत्रांनी सांगितले. एकत्रित लढल्यास त्याचा फायदा होईल, याकडे लक्ष वेधण्यात आले. मुंबई महानगरपालिकेसह इतरही स्थानिक निवडणुकांसाठीही आघाडीचे हे सूत्र वापरावे, यावरही चर्चा झाली. या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. मात्र, यावर अंतिम निर्णय झाला नाही. स्थानिक नेत्यांची चर्चा केल्यानंतरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे वेणुगोपाल यांनी या वेळी स्पष्ट केले.

मुंबई काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष

आगामी मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढावी यासाठी मुंबई काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी उघड भूमिका जाहीर केली आहे. यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींची भेटही घेतली होती. त्यामुळे वेणुगोपाल यांच्या या भेटीनंतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत मुंबई काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.

महत्वाचे लेख