अ‍ॅपशहर

व्वा रवींद्र... भाजपचा ३० वर्षांचा बालेकिल्ला भुईसपाट केला, उद्धव ठाकरेंकडून धंगेकरांच्या पाठीवर कौतुकाची थाप

कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर जाऊन भेट घेतली. कसब्यात सर्व शिवसैनिकांनी माझ्या विजयासाठी खूप मेहनत घेतली, आपल्या कष्टाचं चीज झालं, असं सांगतानाच रवींद्र धंगेकर यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. ठाकरेंनीही धंगेकरांना विजयाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

Authored byअक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Mar 2023, 2:16 pm

हायलाइट्स:

  • भाजपला अस्मान दाखवून तू आत्मविश्वास दिला
  • मला ५६ वर्षांपूर्वीच्या निवडणुकीची आठवण झाली
  • उद्धव ठाकरेंनी यादगार किस्सा सांगितला

बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
मुंबई : विरोधक ताकदीनिशी एकत्र आले तर आपण भाजपला अस्मान दाखवू शकतो याचा आत्मविश्वास रवींद्र धंगेकर यांनी दिला. साधारण ३० वर्षांपासून भाजपचा असलेला बालेकिल्ला भुईसपाट करुन आपण जिंकू शकतो, हा आत्मविश्वास त्यांनी केवळ पुणेकरांनाच नाही, केवळ महाराष्ट्रालाच नाही तर देशातल्या जनतेला दिला. त्यामुळे पुढच्या निवडणुकीतही याच पद्धतीने काम करुन आगामी निवडणुका जिंकुयात, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला. त्याचवेळी धंगेकर यांच्या विजयाने मुंबईतील स.का. पाटील विरुद्ध जॉर्ज फर्नांडिस यांच्या लढतीची आठवण झाली, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
कसब्याच्या रणांगणात भाजपला पराभवाची धूळ चारुन राज्यात चर्चेत आलेले काँग्रेस नेते आमदार रवींद्र धंगेकर यांनी सपत्निक 'मातोश्री'वर जाऊन आज उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. कसब्यात शिवसैनिकांनी जीवाचं रान करुन मला मदत केली, निवडणुकीत माझ्यामागे खंबीर उभे राहिले, याबद्दल त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना धन्यवाद दिले. यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, आमदार सचिन अहिर, काँग्रेस नेते मोहन जोशी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, "रवींद्र धंगेकरांच्या विजयाने मला स.का. पाटील विरुद्ध जॉर्ज फर्नांडिस यांच्या लढतीची आठवण झाली. जॉर्ज फर्नांडिस नावाच्या नवख्या उमेदवाराने काँग्रेसचे मातब्बर उमेदवार स.का. पाटील यांना पराभवाची धूळ चारली होती. जॉर्ज फर्नांडिस यांनी घोषणा दिली होती की आपण-तुम्ही-आम्ही स.का. पाटलांना पाडू शकतो. सगळ्यांना असं वाटलं होतं की सका पाटलांसारखा उमेदवार असताना जॉर्ज फर्नांडिस यांचं काय करु शकणार? पण चमत्कार घडला आणि जॉर्ज फर्नांडिस विजयी झाले. त्याच विजयाची आठवण आज कसब्याने करुन दिलीये".

"साधारण ३० वर्षांचा भाजपचा असलेला बालेकिल्ला भुईसपाट करुन आपण जिंकू शकतो, हा आत्मविश्वास धंगेकरांनी केवळ पुणेकरांनाच नाही, केवळ महाराष्ट्रालाच नाही तर देशातल्या जनतेला दिला. मोहनराव जोशी- आपले पूर्वीचे ऋणानुबंध आहेत, आता आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. पुढच्या निवडणुकीतही याच पद्धतीने काम करुन जिंकुयात", असा निर्धार व्यक्त करतानाच उद्धव ठाकरे यांनी रवींद्र धंगेकरांना विजयाच्या शुभेच्छा आणि पुढील कारकीर्दीसाठी मनोकामना व्यक्त केल्या.

तुम्ही पंतप्रधान होणार का? उद्धव ठाकरे म्हणाले....

भाजपविरोधात मजबुतीने उभा ठाकण्यासाठी विरोधी पक्षांकडून तुमचं नाव पंतप्रधानपदासाठी चर्चेत आहे, या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी सगळ्या शक्यता फेटाळून लावल्या. "माझ्या मनात असं कोणतंच स्वप्न नाही. स्वप्नात मी रमणारा-दंगणारा नाही. जी जबाबदारी येते ती मी पार पाडतो. मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी माझ्यावर आली होती, ती ही खमकेपणाने मी पार पाडली. पण एक नक्की देशातली लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम देशातल्या जनतेने आता खांद्यावर घ्यावं", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
लेखकाबद्दल
अक्षय आढाव
अक्षय आढाव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | याआधी टीव्ही ९ मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ५ वर्षांचा अनुभव | राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची विशेष आवड.... आणखी वाचा

महत्वाचे लेख