अ‍ॅपशहर

MLC Election: लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसचा आक्षेप, राज्यसभेची पुनरावृत्ती?

भाजपचे झुंजार आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. त्यांची मतपत्रिका दुसऱ्याने मतपेटीत टाकल्याचं काँग्रेसचा आरोप आहे.

Authored byअक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Jun 2022, 4:54 pm
मुंबई : भाजपचे झुंजार आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. त्यांची मतपत्रिका दुसऱ्याने मतपेटीत टाकल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. जो सदस्य मतदान करतो, त्याच सदस्याने आपली मतपत्रिका मतपेटीत टाकावी, असा नियम असल्याचं काँग्रेसचं मत आहे. मात्र लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्याऐवजी दुसऱ्याने त्यांची मतपत्रिका मतपेटीत टाकल्याने त्यांचं मत बाद करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसने रिटर्निंग ऑफिसरकडे तशी तक्रार केली आहे. तसेच आपल्या तक्रारीचा निवडणूक आयोगाला मेलही केला आहे. त्यामुळे राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेची मतमोजणी देखील लांबते का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम laxman Jagtap And Mukta Tilak
लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक


काँग्रेसचं म्हणणं काय?

कुणी जर आजारी असेल, कुणाला वाचता येत नसेल, मत द्यायला कोणत्याही प्रकारची असमर्थता असेल तर ते अन्य कुणाची मदत घेऊ शकतात, पण त्यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घालून दिलेले आहेत. त्याच नियमांचं पालन भाजपकडून झालेलं नाही. जर दोन्ही उमेदवार आपल्या मतपत्रिकेवर सही करु शकतात तर मग आपली मतपत्रिका मतपेटीत का टाकू शकत नाही, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.

भाजपचं म्हणणं काय?

सगळ्या नियमांचं पालन करुन तसेच रिटर्निंग ऑफिसरच्या परवानगीने संबंधितांनी मतदान केलं आहे. काँग्रेसचा घेतलेला आक्षेप तकलादू आहे. त्यांना पराभव दिसतोय, ते नक्कीच तोंडावर आपटतील. यांना विनाशकाले विपरीत बुद्धी आलेली आहे. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या पक्षनिष्ठेला सॅल्यूट करतो, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या आक्षेपानंतर भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

नियम काय सांगतो?

मत टाकायला असमर्थ असलेल्या सदस्याने सहकाऱ्याची मदत घेतली तरी चालते. फक्त सहकाऱ्याने वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली असावीत. फक्त संबंधित सहकाऱ्यावर एकच बंधन आहे, ते म्हणजे त्याने कुणाला मत दिलं हे सांगू नये, अर्थात सिक्रसी सांगू नये.
लेखकाबद्दल
अक्षय आढाव
अक्षय आढाव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | याआधी टीव्ही ९ मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ५ वर्षांचा अनुभव | राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची विशेष आवड.... आणखी वाचा

महत्वाचे लेख