अ‍ॅपशहर

महाराष्ट्रात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर; लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेताच नाना पटोले राज्याचा दौरा करणार

Nana Patole : दोन दिवसांच्या आढावा बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे राज्याचा दौरा करणार आहेत.

महाराष्ट्र टाइम्स 3 Jun 2023, 7:56 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मतदारसंघाचा आढावा घेण्यास शुक्रवारपासून सुरुवात केली. विदर्भातील सर्व जागा पक्षाने लढवाव्यात, अशी भूमिका तेथील नेत्यांनी या बैठकीत मांडल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम congress flag fb.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राज्याचा दौरा करणार


महाराष्ट्र काँग्रेसतर्फे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, रावेर, अहमदनगर, शिर्डी, नाशिक, दिंडोरी, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ वाशिम, गडचिरोली चिमूर, भंडारा गोदिया, वर्धा, नागपूर, रामटेक व पालघर या मतदारसंघाचा शुक्रवारी आढावा घेण्यात आला. उर्वरित मतदारसंघाचा आढावा आज, शनिवारी घेतला जाणार आहे. या बैठकीत विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषद गटनेते सतेज पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान आदी उपस्थित होते.

निवडणुका कधीही जाहीर झाल्या तरी काँग्रेस पक्ष तयार आहे. त्यादृष्टीने आढावा बैठकीत स्थानिक नेत्यांकडून माहिती घेतली जात आहे, असे पटोले यांनी सांगितले. विदर्भासह राज्यात विविध भागांत काँग्रेसला मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकांना सामोरे जात आहेत. भाजपला जो पराभूत करू शकेल त्यालाच उमेदवारी दिला जावी असा एकंदर सूर असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. महाविकास आघाडीत बिघाडी व्हावी असा काही जणांचा प्रयत्न सुरू आहे, मात्र तसे काहीही होणार नाही. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र निवडणुका लढवणार आहोत. काँग्रेस पक्ष मतदारसंघाचा आढावा घेत आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा होऊन जागा निश्चित होतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
४६ वर्षे काँग्रेसचा खासदार, मग राष्ट्रवादीला जागा का सोडायची? मुंबईतल्या हायव्होल्टेज बैठकीत काय घडलं?
सरकारमध्ये धमक नाही...

या बैठकीत सकारात्मक चर्चा होत असून राज्यातील शिंदे-फडणवीस या जातीयवादी सरकारला गाडण्याचा निर्धार करण्यात आला आहे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. शिंदे-फडणवीस सरकारने ज्यापद्धतीने मविआचे सरकार पाडले त्याचा नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केल्याचा संदेश जनमानसात गेला असून महाविकास आघाडी करूनच निवडणुका लढवल्या जाव्यात असा एकंदर सूर बैठकीत उमटत आहे. देशातील एकूण चित्र पहाता राज्यातील शिंदे फडणवीस सरकार निवडणुकीस जाण्याच्या तयारीत नाही. त्यांना पराभवाची धास्ती असल्यानेच ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळत आहेत, असा आरोप चव्हाण यांनी केला.

महत्वाचे लेख