अ‍ॅपशहर

करोना- रुग्णाला उपचारच नाकारले!

इतर रुग्णालयात प्रवेश न मिळाल्याने नातेवाईकांनी त्या रुग्णाला पुन्हा कस्तुरबाच्याच तापावर उपचार करणाऱ्या वॉर्डमध्येच दाखल केले. त्यानंतर त्याची चाचणी केली असता त्याला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

Sanjay Vhanmane | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Apr 2020, 10:34 am
संजय व्हनमाने, मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्दी-पडशाची लक्षणे असलेल्यांनाही सरकारी रुग्णालयांमध्ये धाव घेण्याचा सल्ला दिला असताना प्रत्यक्षात सरकारी रुग्णालयात मात्र करोनाची चाचणी करण्यातच चालढकल होत असल्याचा अनुभव येत आहे. सर्दी, ताप, उलट्या झाल्यामुळे कस्तुरबा रुग्णालयात दाखल झालेल्या एका रुग्णाला तुम्हाला करोनाची लागण झालेली नसून केवळ ताप आहे, त्यामुळे तुम्ही इतर रुग्णालयात दाखल व्हा, असे डॉक्टरांनी लेखी दिले. मात्र इतर रुग्णालयात प्रवेश न मिळाल्याने नातेवाईकांनी त्या रुग्णाला पुन्हा कस्तुरबाच्याच तापावर उपचार करणाऱ्या वॉर्डमध्येच दाखल केले. त्यानंतर त्याची चाचणी केली असता त्याला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम corona5


दक्षिण मुंबईतील एका रुग्णाला गेल्या तीन दिवसांपासून सर्दी, ताप खोकला आणि उलट्या होत होत्या. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी शनिवारी रात्री आठच्या सुमारास त्याला कस्तुरबा रुग्णालयात नेले. या रुग्णाची प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्याला करोना झाला नसल्याचे कस्तुरबामधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर त्याला करोनाची चाचणी करण्याची गरज नसल्याचे लेखी दिले. तापासाठी इतर रुग्णालयात दाखल होण्याचा सल्लाही देण्यात आला. त्याच्या नातेवाईकांनी बाहेर चौकशी केली असता त्यांना इतर रुग्णालयाकडूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पुन्हा कस्तुरबाकडेच विनंती केली. त्यानंतर या रुग्णाला तापावर उपचार करणाऱ्या वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. रात्री उशिरा पुन्हा त्याला त्रास होऊ लागल्यानंतर त्याची करोनाचाचणी करण्यात आली. या चाचणीचे शनिवारी सकाळी अहवाल आले असून त्याला लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या रुग्णाच्या नातेवाईकांनीच याबाबतची माहिती दिली.

किट्स अपुरे?

सर्दी, पडसे, न्यूमोनियाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी नेहमीच्या दवाखान्यात न जाता सरकारी रुग्णालयात, चाचणी केंद्रात जाऊन आपली तपासणी करून घ्यावी. त्यामुळे इतर दवाखाने सुरक्षित राहतील, बंद होणार नाहीत, अशी सूचना खुद्द ठाकरे यांनीच केली आहे. मात्र प्रत्यक्षात लक्षणे असतानाही रुग्णालयात करोनाची चाचणी करण्यात येत नसल्याच्या या प्रकारामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. करोना चाचणीसंदर्भातील किट्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याची दबक्या आवाजातील चर्चा या रुग्णालयांकडून ऐकायला मिळत असून प्रशासनाकडून मात्र दुजोरा मिळालेला नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज