अ‍ॅपशहर

दिलासादायक! राज्यातील 'या' जिल्ह्यांत करोना रुग्णांची संख्या उतरणीला

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर आता हळूहळू ओसरत आहे. करोना संसर्गाचा जोर अधिक होता, अशा जिल्ह्यांतील उपचाराधीन रुग्णांची संख्या आता उतरणीला लागल्याचे दिलासादायक चित्र आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 29 May 2021, 9:23 am
मुंबई :करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर आता हळूहळू कमी होत आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये करोना संसर्गाचा जोर अधिक होता, त्या जिल्ह्यांतील उपचाराधीन रुग्णांची संख्या आता उतरणीला लागल्याचे दिलासादायक चित्र आहे. राज्यातील पंधरा जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण राज्याच्या सरासरी प्रमाणापेक्षाही कमी असल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम दिलासादायक! राज्यातील या जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या उतरणीला


पहिल्या लाटेशी तुलना करता राज्यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, जळगाव, नंदूरबार, धुळे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर येथे उपचाराधीन रुग्णसंख्येचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते. तर पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, जालना, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली येथे हे प्रमाण वाढले आहे.

राज्यात पहिल्या लाटेमधील सर्वाधिक रुग्णसंख्या ही ३ लाख १ हजार ७५२ इतकी नोंदवण्यात आली होती. तर दुसऱ्या लाटेमध्ये हीच संख्या ३ लाख १५ हजार ४२ इतकी झाली आहे. या दोन्हीमध्ये ४.४० टक्क्यांचा फरक दिसून आला आहे.

मुंबईत पहिल्या लाटेत सर्वाधिक रुग्णसंख्या ही ३४ हजार २५९ इतकी होती. २६ मे रोजी रुग्णसंख्या २८ हजार ७४ इतकी नोंदवली आहे. टक्केवारीमध्ये हा फरक १८.०५ टक्के इतका होता. ठाण्यामध्ये रुग्णांची आकडेवारी ३८ हजार ३८८ इतकी पहिल्या लाटेत तर दुसऱ्या लाटेमध्ये २१ हजार ९४९ इतकी होती. रायगडमध्ये पहिल्या लाटेमध्ये ११ हजार ५६ तर दुसऱ्या लाटेत ५,५२७ इतकी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. तर ५० टक्क्यांनी रुग्णसंख्येमध्ये घट दिसून आली होती. ज्या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्या कमी आहे तिथे टक्केवारीच्या प्रमाणामध्ये रुग्णसंख्येनुसार मोठी वाढ वा घट दिसून येत आहे.

-चंद्रपूर, धुळे, औरंगाबाद, लातूर, नाशिक, पुणे, जळगाव, गोंदिया, भंडारा, मुंबई, ठाणे, नागपूर नंदूरबार नांदेड येथे राज्याच्या सरासरीपेक्षा म्हणजे ०.४७ टक्क्यांपेक्षा रुग्णवाढीचा दर हा कमी असल्याचे दिसून आले आहे.

-उपचाराधीन रुग्णांच्या तुलनेत रुग्णालयांत दाखल रुग्णांचे प्रमाण ३६.५ टक्के

सौम्य लक्षणे वा लक्षणविरहित रुग्ण – ६३.५ टक्के

गंभीर रुग्ण – १७.३९ टक्के

आयसीयूमधील रुग्ण – ६.१९ टक्के

व्हेंटिलेटवर असलेले रुग्ण – २.२३

ऑक्सिजनवरील रुग्ण – ३.९६ टक्के

अतिदक्षता विभागाबाहेरील रुग्ण – ११.२० टक्के

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज