अ‍ॅपशहर

टेन्शन वाढले! मुंबई, ठाण्यातील करोना रुग्णसंख्या वाढतीच; पाहा राज्यातील स्थिती

Coronavirus News Update: राज्यात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही रुग्णांची वाढत आहे. राज्यात ४ हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत दोन हजारांहून अधिक रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 16 Jun 2022, 2:15 pm
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई ः दैनंदिन करोना रुग्णसंख्या दीड हजारपेक्षा अधिक वाढू न देण्यासाठी यंत्रणांचे अथक प्रयत्न सुरू असले तरी बुधवारी मुंबईमध्ये करोना रुग्णसंख्या दोन हजारावर गेली. दिवसभरात एका रुग्णाचा करोनामुळे मृत्यू झाल्याचे पालिकेने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम covid cases in mumbai maharashtra today
टेन्शन वाढले! मुंबईतील करोना रुग्णसंख्या वाढतीच, ठाण्यातही रुग्णवाढ; पाहा राज्यातील स्थिती


बुधवारी संसर्गामुळे रुग्णालयामध्ये दाखल कराव्या लागलेल्या रुग्णांची संख्या ८४ इतकी असून ११ रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागली. सध्या २.०८ टक्के रुग्ण रुग्णालयामध्ये दाखल आहेत. सात दिवसांपूर्वी हे प्रमाण सव्वा टक्का इतके होते. करोना संसर्गाची लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या ९६ टक्के असून अनेक रुग्णांना सौम्य व मध्यम स्वरूपाची लक्षणे दिसून आली आहेत. करोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या १,७६४ इतकी आहे. मुंबईमध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्या महिला रुग्णाचे वय साठ वर्षांवर होते. या रुग्णाला दीर्घकालीन आजार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

अशी आहे मुंबईतील सद्यस्थिती

- बरे झालेल्या रुग्णांचा दर : ९७ टक्के

- ८ ते १४ जूनपर्यंत करोनावाढीचा दर - ०.१५५ टक्के

- रुग्णदुपटीचा कालावधी - ४३८ दिवस

ठाणे जिल्ह्यात ८५२ रुग्णांची भर

ठाणे : जिल्ह्यात बुधवारी करोनाचे ८५२ नवे रुग्ण आढळले. त्यापैकी ठाणे शहरात ३२३, नवी मुंबईत ३०३, मिरा-भाईंदरमध्ये ८९, कल्याण-डोंबिवलीत ७९, ठाणे ग्रामीण ३६, उल्हासनगर १०, बदलापूर ९, भिवंडीमध्ये ३ रुग्ण आढळले.

राज्यातील करोनाच्या वाढत्या रुग्णांचं कारण समोर, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

राज्यात बुधवारी ४,०२४ रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात बुधवारी ४,०२४ नवीन करोनाबाधितांचे निदान झाले. दिवसभरात राज्यात दोन करोनारुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यात सध्या १९,२६१ उपचाराधीन रुग्ण आहेत, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

दिवसभरात राज्यात ३,०२८ करोनाबाधित बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७ लाख ५२ हजार ३०४ करोनाबाधित बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८९ टक्के इतके आहे. पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजच्या ताज्या अहवालानुसार राज्यात बीए.५ उपप्रकाराचे आणखी चार रुग्ण आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी एक रुग्ण मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे येथील आहे. हे सर्व रुग्ण १९ ते ३६ वर्षे वयोगटातील महिला आहेत. यापैकी तीन रुग्णांची जनुकीय क्रमनिर्धारण तपासणी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत आणि एका रुग्णाची तपासणी पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये करण्यात आली. हे सर्व रुग्ण २६ मे ते ९ जून २०२२ या कालावधीतील असून, सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज